Tuesday, August 11, 2020

वनामकृविच्‍या वतीने हुमनी किडीच्या व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन

दर शनिवारी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेस मोठा प्रतिसाद, येत्‍या शनिवारी जैविक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दर शनिवारी सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले असुन मालिकेच्‍या चौथे सत्रात दिनांक ८ ऑगस्‍ट रोजी हुमनी किडीचे व्यवस्थापन या विषयावर किटकशास्‍त्र डॉ धीरजकुमार कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, हुमनी हि बहुभक्षी असून मराठवाडयातील जवळपास सर्वच पिकांवर आढळुन येणारी घातक किड असुन किडीचा जीवनक्रम समजुन घेउन गनिमकावाच्या मार्गाचा वापर करुन या किडीचे वेळीच व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला दिला.  

कार्यक्रमात डॉ. धीरजकुमार कदम यांनी हुमणी किडींच्या व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ते म्‍हणाले की, हुमणी हि बहुभक्षी किड असून अळी व प्रौढ या दोन्ही अवस्थेचे खाद्य हे वेगवेगले आहे. अळी हि पिकांच्या मुळ वर तर प्रौढ हे कडूलिंम्ब, बाभुळ, बोर, चिंच आदी प्रकारच्या झाडांच्या पानावर उपजीविका करतात. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी जीवनक्रम सजुन घेणे अतिशय महत्वाचे आहे. प्रौढ अवस्थेच्या व्यवस्थापनासाठी यांत्रिकी पद्धतीमध्ये प्रकाश सापळ्याचा प्रामुख्याने वापर करावा. वीस पेक्षा जास्त भुंगे झाडांवर आढल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. प्रथम अवस्थेतील अळ्या शेणखतात आढळुन आल्यास मेटा-हायझीयम अनिसोपोली या जैविक बुरशीचा १ किलो प्रती टन शेनखतात मिसळवे व पिकामध्ये वापरायचे झाल्यास १० किलो प्रती हेक्टरी वापरावे. आंतरमशागत करतांना पृष्टभागावर आलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. शक्य असल्यास वाहते पानी द्यावे जेने करुन या अळ्या गुदमरून मरतील. जास्त प्रादुर्भाव आढळल्यास फोरेट १० सीजी २५ किलो प्रती हेक्टरी वापरावे किंवा फिप्रोनिल ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड ४० टक्के या रासायनिक कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यातुन पिकाच्या खोडा भोवती आळवनी करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

यावेळी शेतकरी बांधवांनी विचारलेल्‍या हुमणी कीडीबाबत प्रश्‍नांना डॉ धीरजकुमार कदम यांनी उत्‍तरे दिली. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास झुम मिटिंगच्‍या माध्‍यमातुन 300 हुन अधिक तर युटयुबच्या माध्यमातुन एक हजारपेक्षा अधिक शेतकरी व कृषि विस्‍तारकांनी सहभाग नोंदवीला. 

येत्‍या शनिवारी जैविक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन 

सदरिल राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचे पाचवे सत्र शनिवार दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी संध्याकाळी वाजता आयोजित केले असुन यात जैविक कीड व्यवस्थापन या विषयावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर हे मार्गदर्शन झुम मिटिंगच्‍या माध्‍यमातुनकरणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे, तरी या मालिकेत बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.