Tuesday, August 11, 2020

हळदीवरील कंदमाशीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आतापासूनच प्रादुर्भावाकडे लक्ष असू द्या...!

मराठवाडयात हळदी पिकाखालील वाढत आहे, विशेषत : हिंगोली, नांदेड, परभणी जिल्‍हयातील शेतकरी बांधव हळद लागवड करीत आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

कंदमाशी - कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. प्रौढ माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. ज्या ठिकाणी हळदीचे कंद उघडे पडलेले असतील त्या ठिकाणी जमिनीलगत प्रौढ माशी अंडी देते व अशा अंड्यातून अळ्या बाहेर पडून उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात. जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड जुलै-ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

व्यवस्थापनाचे उपाय : जुलै ते ऑक्टोंबर दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५% टक्के २० मि.ली. किंवा डायमिथोएट ३० टक्के १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळून आलटुन-पालटून फवारावे. उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. तसेच जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात एकदा करावी. कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी. त्याचबरोबर एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात  एरंडीचे २०० ग्रॅम भरडलेले बी घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद जमा करून नष्ट करावेत.

अशाप्रकारे कंदमाशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन व्यवस्थापनविषयी योग्य उपायोजना करून भविष्यात होणारे नुकसान टाळावे. हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

(संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा.  दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००