Wednesday, August 5, 2020

वनामकृविच्‍या वतीने सद्यस्थितीत सोयाबीन वरील किडींचे व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर या राज्यस्तरीय वेबीनार मालिके अंतर्गत दिनांक १ ऑगष्ट रोजी सद्यस्थितीत सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजीत करण्यात आलीहोती. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते, मुख्‍य मार्गदर्शक किटकशास्‍त्रज्ञ व आयोजक डॉ धीरजकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.   

कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक किटक‍शास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर यांनी सद्यस्थितीत सोयाबिन पिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापना बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्‍यांनी सांगितले की सोयाबीन हे पिक बदलत्या वातावरणानुसार कीडींसाठी जास्त सवेदनशील बनत आहे. सद्यस्थितीत सोयाबीनमध्‍ये चक्रीभुंगा व खोडमाशी या कीडींचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक आढळुन येत आहे. सद्याचे वातावरण तंबाखूवरील पाने खाणा-या अळीसाठी पुरक असल्याने या कीडीच्या सर्वेक्षणावर शेतक-यांनी भर दयावा. आगामी काळात एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे तंत्र प्रभावीपणे राबवावे. यामध्ये कामगंध सापळयांचा वापर जास्तीत जास्त करावा. नोमोरीया रिलाई या उपयुक्त बुरशीसाठी सद्याचे वातावरण पोषक असल्याने या बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, रासायनिक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १२.६ + लॅमडासाहॅलोथ्रीन ९.५ झेडसी २.५ मिलि ‍किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३ + लॅमडासाहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. फवारणी करताना योग्य त्या सुरक्षा मानकाचा वापर करावा असे आवाहन केले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सोयाबीन हे महत्‍वाचे तेलवर्गीय पिक असुन सोयाबीन पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठीची ही योग्य वेळ आहे. विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अत्यंत योग्य वेळेवर शेतक-यांमध्ये सोयाबीन कीड व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. कार्यक्रमास ३७५ पेक्षा अधिक शेतक-यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवीला. तर युटूब च्या माध्यमातुन दोन हजार पेक्षा अधिक शेतक-यांनी सहभाग नोंदवीला. सदरिल राज्यस्तरीय वेबीनार मालिकेत दिनांक ८ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता हुमणी किडीचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. धीरजकुमार कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.