Saturday, August 8, 2020

वनामकृवि विकसित बीबीएफ व फवारणी यंत्रास शेतकरी बांधवाची मोठी पसंती

मौजे जांब शिवारात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख मार्गदर्शनात घेण्‍यात आले प्रात्‍यक्षिकेे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ऑगस्ट रोजी मौजे जांंब शिवारामध्ये विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र तसेच बैलचलीत सौर ऊर्जेवरील फवारणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा श्री अशोक ढवण यांच्‍या विशेष उपस्थिती करण्‍यात आले होते. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री संतोष आळसे, प्राचार्य डॉ उदय खोडके, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता डॉ स्मिता सोंलुकी, उपविभागीय कृषि अधिकारी श्री सागर खटकाळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री बाळासाहेब रेंगे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रात्‍यक्षिक पाहण्‍याकरिता मौजे पारवा, सोन्ना व मौजे जांंब या शिवारातील शेतकरी उपस्थित होते. सदरिल विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र व बैलचलीत सौरऊर्जेवरील फवारणी यंत्र बाबत शेतक-यामध्‍ये मोठी उत्‍सुकता असल्‍याचे लक्षात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातीत शेती प्रामुख्‍याने कोरडवाहु असुन सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे. कोरडवाहु शेतीत पिकांचे उत्‍पादन पडणा-या पाऊसाच्‍या पाण्‍यावरच पुर्णपणे अवलंबुन असुन हिच गरज ओळखुन परभणी कृषि विद्यापीठाने बहुउद्देशीय बीबीएफ यंत्र विकसित केले आहे. परंतु हे यंत्र वापरतांना येणा-या अडचणीचा विचार करता यावर्षी कृषि विभागाच्‍या सहकार्याने परभणी जिल्‍हयातील शेतकरी बांधवाच्‍या शेतात १२५ एकर क्षेत्रावर या यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी करण्‍यात आली. तसेच सौर ऊर्जेचा वापर शेती क्षेत्रात करून शेतकरी बांधव लागवडीवरील खर्च आपण कमी करू शकतो, याकरिता विद्यापीठाने सौर ऊर्जेवर चालणार फवारणी यंत्र विकसित केले. शेतकरी बांधवाची गरजेवर आधारित उपयुक्‍त संशोधन करण्‍याचा कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावेळी डॉ देवराव देवसरकर यांनी पीक लागवड पद्धतीपीक व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले तर श्री संतोष आळसे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनाचा शेतकरी बांधवानी लाभ घेण्‍याचे आवाहन केलेश्री सागर खटकाळे यांनीही मार्गदर्शन केले.

विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र तसेच बैलचलीत सौर ऊर्जेवरील फवारणी यंत्र यांचे प्रात्यक्षिक डॉ स्मिता सोलंकी यांनी दाखवुन सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतक-यांना भेडसवणा-या यांत्रिकीकरणातील समस्‍याचे समाधान केले. मार्गदर्शनात डॉ स्मिता सोलंकी म्‍हणाल्‍या की, अनेक शेतकरी बांधवाकडे ट्रॅक्‍टर उपलब्‍ध आहेत, परंतु त्‍याचा पुर्णक्षमतेने वापर होतांना दिसत नाही. केवळ पिकांच्‍या पेरणी पुरते त्‍याचा वापर मर्यादित आहे, परंतु विद्यापीठ विकसित बहुउद्देशीय बीबीएफ यंत्रामुळे पेरणी, रासणी, कोळपणी, तणनाशक व किटकनाशक फवारणी आदी कामे ट्रॅक्‍टरने शक्‍य आहे. ट्रॅक्‍टर ला कमी रूंदीचे टायरचा वापर केल्‍यास उभ्‍या पिकांमध्‍ये कोळपणी व फवारणी शक्‍य होते. हेच सिध्‍द करण्‍याकरिता विद्यापीठ शेतक-यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिके करून दाखवित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

यावर्षी परभणी जिल्‍हयातील विविध गावांतील ४५ निवडक शेतकरी बांधवाच्‍या १२५ एकर क्षेत्रावर कृषि विभागाच्‍या सहकार्याने विद्यापीठ विकसित बीबीए पेरणी यंत्राव्‍दारे सोयाबीन लागवड करण्‍यात आली. कार्यक्रमात सदरिल क्षेत्रावरील सोयाबीन पिकांची वाढ इतर पिकांपेक्षा जोमाने होत असल्‍याचे लाभार्थी शेतकरी श्री महेश शेळके, राम गमे, रामकृष्ण रेंगे आदींनी सांगुन बीबीएफ यंत्राच्‍या वापरामुळे मोठया प्रमाणात बियाणे, खत, तणनाशक, किटकनाशक आदी निविष्‍ठांवरील खर्चात बचत होऊन कार्यक्षम व योग्‍य वेळी शेतकाम करणे शक्‍य झाल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.