Friday, August 7, 2020

वनामकृवित आयोजित बालविकास शैक्षणिक केंद्र व्यवस्थापनावर ऑनलाईन प्रशिक्षणाचे उदघाटन

सामुदायिक महाविद्यालयाचा अभिनव ऑनलाईन उपक्रम

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावातही अनेक गरजूंना  नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयांतर्गत असणाऱ्या मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातर्फे बालविकास शैक्षणिक केंद्र व्यवस्थापन यावर राज्यस्‍तरिय ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 5 ऑगस्‍ट ते 15 सप्‍टेबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक 5 ऑगस्‍ट रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन कार्यक्रम संपन्‍न झाला. प्रमुख अतिथी म्‍हणुन नवीन राष्ट्रीय धोरणांतर्गत विशेषतः बालशिक्षणाच्या बाबतीत योगदान दिलेल्या मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्‍या माजी प्राचार्या डॉ. रिता सोनावत या सहभागी झाल्‍या होत्‍या तर सामुदायिक महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड, प्रशिक्षण समन्वयीका तथा मानव विकास विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे, सह-समन्वयिका डॉ. वीणा भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. रिता सोनावत यांनी नवीन शैक्षणिक धोरणामुळे दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळांना अतिशय महत्व येणार असल्याचे मत व्‍यक्‍त केले. कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही विद्यापीठातर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून हे प्रशिक्षण राबविण्यात येत असल्याने आयोजकांची कौतुक केले. तर प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांनी समाजामध्ये दर्जेदार बालविकास व शैक्षणिक केंद्रांना भरपूर मागणी असल्याने प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ होणार असल्‍याचे सांगितले.

या प्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थी दैवशाला देशमुख व मनिषा टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अभ्यासक्रमासाठी राज्‍यातील विविध ठिकाणाच्या प्रशिक्षणार्थींचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रास्‍ताविक डॉ. जया बंगाळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. महाविद्यालयातील डॉ.शंकर पुरी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली तथा विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.