विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रांतर्गत ८०० हेक्टरवर बीजोत्पादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित विविध पिकांच्या वाणाच्या दर्जेदार बियाणास शेतकरी बांधवामध्ये मोठी मागणी आहे, यात सोयाबीन, तुर, ज्वारी आदीच्या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती लक्षात घेता बीजोत्पादन वाढ करणे महत्वाचे होते. विद्यापीठातील मध्यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्यान बीजोत्पादन घेतले जात होते, परंतु गेल्या काही वर्षापासुन निधी व मनुष्यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. गेल्या दोन वर्षात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्पादन वाढ करण्याच्या उद्देश्याने मध्यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केला. पडित जमीन लागवडीखाली आणण्यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुन जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्यादी मशागतीचे कामे एप्रिल – मे २०२३ मध्ये करण्यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्प व योजनातील उपलब्ध ट्रॅक्टर्स, आवश्यक औजारे, जेसीबी यांचा वापर करण्यात आला. मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास ८०० हेक्टर जमिन क्षेत्रावर अपुरे मनुष्यबळ,
निधी, वन्य प्राण्याचा उपद्रव, नैसर्गिक आपत्तींचा सामना करून आणि उपलब्ध
साधनसमुग्रीमध्ये पैदासकार बीजोत्पादन हाती घेण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठाच्या उपकॅम्पस येथील १२० हेक्टर एकर जमिन वहितीखाली आली. विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्ती करण्यात आली आहे, या माध्यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता शक्य होत आहे. यामुळे बीजोत्पादनाकरिता काही प्रक्षेत्रावर संरक्षित सिंचन देणे शक्य होत आहे. २०२४ – २५ मध्ये बीजोत्पादनाखालील
क्षेत्र ८०० हेक्टर वरून १३०० हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले. २०२३-२४ च्या खरीप व रबी हंगामामध्ये विद्यापीठाचे बीजोत्पादन साधारणत: ७००० क्विंटल वरून ९१५४.८४ क्विंटल झाले. म्हणजेच साधारणतः ३०
टक्के बीजोत्पादन वाढ झाले. विद्यापीठाने सुरवातीस जमीन लागवडीखाली आणण्यावर भर दिला
आणि पुढील टप्प्यात हेक्टरी उत्पादकता वाढीवर भर देण्यात येत आहे. यामध्ये पायाभूत
सुविधा विकास, शेततळे निर्मिती करून सिंचन क्षेत्रात वाढ, ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा
वापर, यांत्रिकीकरनावर भरदेण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच २०० हेक्टर क्षेत्रावर ड्रोनद्वारे
फवारणी करण्यात आली. या बाबींचा विचार करून कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने २०२४ मध्येही बीजोत्पादन २०,००० क्विंटल करण्याचे लक्ष ठेवले आहे, यामध्ये सोयाबीनचे साधारणत: ८५०० क्विंटल बियाणे मराठवाड्यातील सर्व
जिल्ह्यातील विद्यापीठाच्या ५१ संशोधन आणि बीजोत्पादन केंद्राच्या विविध प्रक्षेत्रावर तसेच
वेगवेगळ्या जमिनीमध्ये आणि हवामानामध्ये तयार झाले. यापैकी मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या ३५० हेक्टरद्वारे ३५०० क्विंटल सोयाबीनचे बीजोत्पादन मिळाले आहे. विद्यापीठ गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या
उद्दिष्टानुसार सोयाबीनचे पैदासकार बीजोत्पादन उतार हा हेक्टरी १० क्विंटल असा असून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील बीजोत्पादनाने तो पूर्ण केला आहे. तसेच काही
केंद्रांनी हेक्टरी २० ते २५ क्विंटल उत्पादन घेतले आहे. २०२४-२५ च्या खरीप, रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये निर्धारित २०,००० क्विंटलचे लक्ष गाठण्यास विद्यापीठास नक्कीच यश मिळेल असा विश्वास कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी व्यक्त केला आहे. यामुळे या वाणांचे जास्तीत जास्त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठाचा बीजोत्पादन कार्यक्रम मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात घेण्यात येतो तथापि मराठवाड्यातील हवामानात आंतरजिल्हा आणि आंतरजिल्ह्यातील विविधतेचा अनुभव येतो. वार्षिक ५०० ते ८३५ मिमी पाऊस पडतो आणि खात्रीशीर पर्जन्य क्षेत्र (६०%), मध्यम जास्त पर्जन्यमान झोन (२०%) आणि टंचाई क्षेत्र (२०%) अंतर्गत येतो. कृषी उत्पादन प्रामुख्याने मान्सूनच्या पावसाच्या अनियमित स्वरूपामुळे मर्यादित आहे. या सोबतच सद्य स्थितीमध्ये हवामान बदलामुले पर्ज्यन्यमानाची अनियमितता निर्माण झाली आहे.
२०२४ मध्ये विद्यापीठाचे मध्यवर्ती प्रक्षेत्र येथील बलसा, सायाळा, तरोडा व शेंद्रा ‘क’ अश्या एकूण ०४ विभागावर पैदासकार सोयाबीन या पिकाच्या एमएयुएस ७१, एमएयुएस ६१२, एमएयुएस ७२५ व एमएयुएस ७३१ या वाणांचा एकूण ४२५ हे. क्षेत्रावर
राबविण्यात आला होता. खरिप
हंगामात माहे जुले व ऑगस्ट महिन्यात पिक फुलोऱ्यात असताना पाऊसाचा खंड (दि. २९.०७.२०२४ ते १८.०८.२०२४) या २० दिवसाचा असल्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर दिसून आला. माहे सप्टेबर महिन्यात सोयबीन पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना एकूण १५ दिवसाचा खंड (दिनांक ०६.०९.२०२४ ते २१.०९.२०२४) असल्यामुळे सोयबीनच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी घट झाल्याचे आढळून आले आहे. सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी (१९६.६ मिमि) झाल्यामुळे सोयबीन पिकाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला दिसून येतो. सदरील अतिवृष्टी मुळे प्रक्षेत्रावर राबविण्यात आलेले सोयबीनचे क्षेत्र एकूण ५० ते ६० हेक्टर क्षेत्रावरिल पिक पूर्णपणे नष्ट झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यामुळे केवळ ३५० हेक्टरद्वारेच बीजोत्पादन मिळू शकले.
विद्यापीठाचे मागील दोन वर्षातील वाण विकासातील योगदान
विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्यापुरते उपयुक्त नसुन देशातील अनेक राज्यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्त ठरले आहे. महाराष्ट्रातील तूर आणि सोयाबीन पिकाखालील एकूण क्षेत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा अर्ध्याहून अधिक वाटा आहे. २०२३ मध्ये केंद्रीय बियाणे अधिनियम, १९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठ विकसित करडई पिकांच्या पीबीएनएस १८४, पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णा) आणि देशी कापसाच्या पीए ८३७, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका) आणि सोयाबीनचे एमएयुएस-७२५ या वाणांचा समावेश केला आहे. याबरोबरच विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बीडिएनपीएच १८ - ५ या संकरित वाणास लागवडीकरिता मान्यता प्राप्त झाली असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे.
कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्यता मिळाली. यामध्ये तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH
1901), एनएच १९०२ (NH
1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश) विभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे. परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्पादनात सातत्य देणारे वाण आहेत.
२०२४ मध्ये करडईचे नवीन पीबीएनएस २२१ आणि पीबीएनएस २२२ वाण, टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या सांभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र, विकसित केलेले चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्यास मदत होणार आहे. तसेच २०२४ मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण, ३ तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच २०२४ मध्ये अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि केळीचा वनामकृवि - एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहार, पशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता प्राप्त झाली आहे.
विद्यापीठाने मध्यवर्ती प्रक्षेत्रावर बिजोत्पादनासह हरित विद्यापीठ - वृक्ष लागवडीची विशेष मोहिम हाती घेतली आहे. विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पासुन वन विभागाच्या माध्यमातुन विद्यापीठातील रेल्वे लाईनच्या लगत ४.५ किलोमीटर फळपिके व वनपिकांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी १०० हेक्टरवर नवीन फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले असुन, यात आंबा, आवळा, बेल, आव्होकोडा तसेच इतर महत्वाच्या फळपिकांच्या विविध ५० हून अधिक जातीची लागवड करण्यात येणार आहे. या फळबागेतून विविध प्रकारचे संशोधन करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यापारी लागवड साध्य करून निर्यातक्षम फळ उत्पादने घेण्यात येणार आहेत.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी प्रक्षेत्र विकासासाठी व्यक्तीश: लक्ष घातले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक
डॉ खिजर बेग यांनी प्रक्षेत्र विकासास कटीबद्ध राहून आवश्यक यंत्रसामुगी उपलब्ध करून दिल्याने एवढे मोठे प्रक्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकले, अशी माहिती प्रक्षेत्र विकासातील महत्वपूर्ण योगदान देणारे मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे यांनी दिली. सदर बीजोत्पादनाकरिता विद्यापीठातील ड्रायव्हर ते डायरेक्टर यांचे मोठया प्रमाणात योगदान लाभत आहे.