Sunday, December 6, 2015

वनामकृवित आंतरराष्‍ट्रीय मृदा दिन साजरा

पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशन–व्‍हीएनएमकेवी) मोबाईल अॅपचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील भारतीय मृद विज्ञान संस्‍था शाखा परभणी यांच्‍या वतीने आंतरराष्‍ट्रीय मृदा दिनानिमित्‍त दिनांक ५ डिसेंबर रोजी मृदा आरोग्‍य पत्रिका वितरण समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन म्‍हणुन परभणी महानगर पालिकाच्‍या महापौर मा श्रीमती संगीता वडकर, कृषीभुषण मा श्री सुर्यकांत देशमुख, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृ‍षी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ विलास भाले, प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ विलास पाटील, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी नाम प्रतिष्‍ठान व मृदविज्ञान संस्‍थेच्‍या वतीने कार्यक्रमात ८७ शेतक-यांना त्‍यांच्‍या शेतातील मातीचे परिक्षण करून त्‍याच्‍या आरोग्‍य पत्रिकेचे वाटप मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमात विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ सय्यद इस्माईल आणि डॉ. हरिहर कौसडीकर यांनी विकसित केलेल्‍या पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशन–व्‍हीएनएमकेवी) या मोबाईल अॅपचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
अध्‍यक्षीय भाषणात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशन–व्‍हीएनएमकेवी) मोबाईल अॅपचे शेतक-यांनी वापर करण्‍याचे आवाहन करून शेतक-यांनी दरवर्षी मातीचे आरोग्‍य तपासण्‍याचा सल्‍ला दिला तर महापौर मा श्रीमती संगीता वडकर यांनी उत्‍पादनवाढीसाठी माती परिक्षण गरजेचे असल्‍याचे सांगितले. भावी पिढीच्‍या चांगल्‍या आरोग्‍यसाठी रासायनिक खतांचा समतोल वापर माती परिक्षणाच्‍या अहवालानुसार करण्‍याचा सल्‍ला कुषीभुषण मा श्री सुर्यकांतराव देशमुख यांनी दिली. शिक्षण संचालक डॉ विलास भाले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कोरडवाहु शेतीत पिक उत्‍पादकता टिकविण्‍याचे मोठे आव्‍हान असुन शेतक-यांनी सेंद्रीय खते, हिरवळीच्‍या खतांचा वापर करावा. आयोजक डॉ विलास पाटील यांनी आरोग्‍यदायी जीवनासाठी आरोग्‍यदायी मृदा असणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन केले तर प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी शेतक-यांनी पिक पध्‍दतीत व्दिदल पिकांचा समावेश करण्‍याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


वनामकृविचे पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्राचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना संजीवनी कृषि पुरस्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रातील कार्याबाबत संजीवनी कृषि पुरस्‍काराने दिनांक ५ डिसेंबर रोजी संजीवनी मित्रमंडळाच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्‍यक्ष मा ना श्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले. याप्रसंगी समाजकल्‍याण राज्‍यमंत्री मा ना श्री दिलीप कांबळे, आमदार मा श्री मोहनराव फड, शिक्षण सभापती मा श्री दादासाहेब टेंगसे, आयोजक श्री आनंद भरोसे, कृषिभुषण श्री कांतराव देशमुख, माजी आमदार श्री विजयराव गव्‍हाणे, गंगाधरराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ ठोंबरे यांनी विविध शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, प्रशिक्षण, आकाशवाणी व दुरदर्शन आदी माध्‍यमातुन शेतक-यांना पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय बाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्य केले असुन त्‍यांनी अनेक पुस्‍तके, संशोधन लेखे, घडी पत्रीकांचे लिखान केले आहे. ते सतत भ्रमणध्‍वनी व गटचर्चाव्‍दारे मराठवाडातील शेतकरी व पशुपालकाच्‍या संपर्कात राहुन त्‍यांना मार्गदर्शन करीत असतात. त्‍यांनी मुख्‍य संशोधन मार्गदर्शक म्‍हणुन अनेक पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले आहे. या पुरस्‍काराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले आदींनी अभिनंदन केले.

अंबाजोगाई कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने जागतिक मृदा दिन साजरा

सौजन्‍य - सह्योगी अधिष्‍ठाता, कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई

Friday, December 4, 2015

वनामकृवीचे पिक पोषक अन्नद्रव्ये बाबत अॅप विकसीत

जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर पासून मोबाईल अॅप उपलब्ध

स्‍मार्टफोन एन्ड्रोईड मोबाईल वापर शेतकरी ही मोठया प्रमाणावर करील असुन आधुनिक शेती तंत्रज्ञान इंटरनेट माध्यमातून माहिती घेत आहेत. संतुलित पिक पोषणाबाबत पूर्ण शेतकरीवर्ग अद्यापपर्यंत पूर्णपणे जागरूक झालेला नाहीत. त्‍या पार्श्‍वभुमीवर पिक पोषणाबाबत शेतक-यांना शास्त्रीय माहिती सोप्या मराठी भाषेत उपलब्ध होण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरुलु यांच्या मार्गदर्शनाखाली मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ सय्यद इस्माईल आणि डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पिक पोषण (प्‍लँट न्‍युट्रिशन –व्‍हीएनएमकेवी) या नावाने एन्ड्रोईड मोबाईल अॅपची निर्मीती केली आहे. याव्‍दारे पिकातील आवश्यक अन्नद्रव्ये कमतरतेची ओळख आणि उपाय, जमिनीचे गुणधर्म याबाबत सविस्तर व सखोल माहिती उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. हि मोबाईल अप्‍स मोफत व इंटरनेट शिवाय ही वापरता येईल, केवळ एक वेळेस डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. डाऊनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर जाऊन इंग्रजी मध्ये plant nutrition-vnmkv असे टाईप करावे. पिक पोषणासाठी आवश्यक नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मगनेशियम, गंधक, लोह , मंगल, तांबे, जस्त, बोरॉन, मोलाब्द यांची पिकातील कार्ये, कमतरतेची लक्षणे शब्दात आणि छायाचित्राच्‍या स्वरुपात, त्यावरील उपाययोजना, विविध सूक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा जमिनीतून व फवारणीतून वापर याबद्दल ची माहिती देण्यात आली आहे. कृषी विस्तार कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी आणि कृषी संबंधित सर्वांसाठी वनामकृवी विकसीत पिक पोषण या मोबाईल अॅपचा उपयोग होईल. हि मोबाईल अॅप सर्वांसाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर पासून औपचारिकरित्या उपलब्ध होणार असुन शेतक-यांची मागणी व गरजेनुसार यात पुढेही सुधारणा करण्‍यात येणार असल्‍याचे विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी सांगितले आहे. 

Thursday, December 3, 2015

वनामकृवि संघास क्रीडा महोत्‍सवात पथसंचलनात प्रथम क्रमांक

वनामकृविस सन २०१६ च्‍या विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे यजमानपद
विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाच्‍या यजमानपदाचे ध्‍वजाचे हस्‍तांतरण करतांना
नांदेड स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १९ व्‍या राज्‍यस्‍तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सव स्‍पर्धा दिनांक २६ नोब्‍हेंबर ते १ डिसेंबर दरम्‍यान पार पडल्‍या. सदरिल स्‍पर्धेमध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कबड्डी, खो-खो, व्‍हॉलीबॉल, मैदानी स्‍पर्धा, बास्‍केटबॉल आदी संघानी सहभाग नोंदविला होता. स्‍पर्धे दरम्‍यान विद्यापीठाच्‍या खेळाडुंनी शिस्‍तीचे व नियमाचे पालन करून उत्‍कृष्‍ट पथसंचनल केले, त्‍या आधारे विद्यापीठाने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्‍त केला. या स्‍पर्धेत विद्यापीठाच्‍या मुलांच्‍या खो-खो व मुलींच्‍या व्‍हॉलीबॉल संघाने अनुक्रमे दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, नाशिक येथील महा‍राष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, औरंगाबादचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जळगांवचे उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्‍या संघास पराभुत करून दोन फे-यात विजय संपादन केला.
क्रीडा महोत्‍सवाच्‍या बक्षीस वितरण समारंभात सन २०१६ च्‍या विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे यजमानपदीची जबाबदारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास देण्‍यात आली असुन स्‍पर्धेचा ध्‍वज सन्‍मानाने विद्यापीठास हस्‍तांतरीत करण्‍यात आला. स्‍वामी रामांनद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पंडित विद्यासागर, आमदार अमिताभाभी चव्‍हाण, स्‍वागताध्‍यक्ष डॉ प्रदिप देशमुख, राज्‍यपाल नियुक्‍त विविध समित्‍यांचे अध्‍यक्ष व सदस्‍य यांच्‍या हस्‍ते विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ आशा देशमुख, प्रा डी एफ राठोड, किशोर शिंदे यांना विद्यापीठाच्‍या वतीने स्‍पर्धेचा ध्‍वज स्‍वीकारला. विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे पुढिल वर्षी आयोजन व नियोजन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या अधिपत्‍याखाली व मार्गदर्शनाखाली करण्‍यात येणार असल्‍याचे विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.  
क्रीडा महोत्‍सवात पथसंचलनासाठी प्रथम क्रमांकाच्‍या चषकासह वनामकृविचा संघ

सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन विषयावरील राष्‍ट्रीय प्रशिक्षणाचा समारोप

मार्गदर्शन करतांना जैन इरिगेशन सिस्‍टीमचे उपाध्‍यक्ष अभियंता श्री सोमनाथ जाधव

अध्‍यक्षीय समारोप करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेम्बर २०१५ दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत शेती निविष्‍ठांची वापर कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी सुक्ष्मसिंचन व विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर राष्‍ट्रीय लघुप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते, या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक २ डिसेंबर रोजी झाला. समारोप कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन जैन इरिगेशन सिस्‍टीमचे उपाध्‍यक्ष अभियंता श्री. सोमनाथ जाधव, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे जैन इरिगेशन सिस्‍टीमचे उपाध्‍यक्ष अभियंता श्री. सोमनाथ जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, देशातील पिक उत्‍पादकता वाढीत पाणी व खत या‍ निविष्‍ठांचा मुख्‍य वाटा असुन सुक्ष्‍मसिंचन व सिंचनाव्‍दारे विद्राव्‍य खते दिल्‍यास या निविष्‍ठांचा कार्यक्षमरित्‍या वापर होईल. या क्षेत्रात अनेक बाबींवर संशोधनाची गरज असुन शेतक-यांना आर्थिकदृष्‍टया किफायतीशीर तंत्रज्ञान देण्‍याची गरज आहे, यासाठी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा शास्‍त्रज्ञांना उपयोग होईल, असे मत यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केले. अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी प्रशिक्षणात प्राप्‍त केलेल्‍या ज्ञान प्रशिक्षणार्थींना शेतक-यांपर्यंत पोहोजविण्‍याचे आवाहन केले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी राज्‍यात अनेक शेतकरी सुक्ष्‍मसिंचनाचा वापर करित असुन त्‍यांच्‍यासाठीही अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमात निवडक प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगतात प्रशिक्षणात सुक्ष्‍मसिंचन व विद्राव्‍य खत व्‍यवस्‍थापनावरिल अद्यावत तंत्रज्ञानाची विविध व्‍यक्‍ताच्‍या मार्गदर्शनामुळे व प्रात्‍यक्षिकामुळे मा‍हिती झाली असे मत व्‍यक्‍त केले तर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍तावि‍क सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. सुमंत जाधव यांनी व आभार प्रदर्शन प्रा. एच डब्‍ल्‍यु आवारी यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात आंध्रप्रदेश, ओरिसा, कर्नाटक, मध्‍यप्रदेश, केरळ, दिल्‍ली, महा‍राष्‍ट्र आदी राज्‍यातील विविध  कृषी विद्यापीठे व कृषि संशोधन संस्थेतील शास्‍त्रज्ञ, प्राध्यापक व तंत्रज्ञ सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ उदय खोडके, जैन इरिगेशन चे उपाध्‍यक श्री सोमनाथ जाधव, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आदी.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

Wednesday, December 2, 2015

आश्विन चेके, डॉ. पाटील व डॉ. कौसडीकर यांना शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार

नागपूर येथे केंद्रीय लीम्बुवर्गीय फळे संशोधन संस्थेत २८ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. हरिहर कौसडीकर व आचार्य पदवी विद्यार्थी आश्विन चेके यांनी भित्तीपत्राकाव्‍दारे सादर केलेल्‍या "मुळाच्या सानिध्यातील मातीच्या संकरणाचा मोसंबी झाडावर होणारा परिणाम" या विषयावरील शोधनिबंधास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. याबाबत सर्वस्तरात विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.