Friday, February 17, 2023

जमिनीत अन्‍नद्रव्‍याची तुट भरून काढणे गरजेचे ........ डॉ. बी पी भास्कर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग आणि भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा-परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी नागपुर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेचे संचालक डॉ. बी.पी. भास्कर यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य आदीची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इंन्‍द्र मणि म्‍हणाले की, देश – विदेशातील अनेक संस्‍था सोबत परभणी कृषी विद्यापीठ जोडले जात असुन नुकतेच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांना भेटी देऊन सहयोगी संशोधन करण्‍याचे निश्चित झाले आहे. अनेक भारतीय शास्‍त्रज्ञ अमेरिकेतील विद्यापीठात चांगल्‍या पदावर असुन याचाही लाभ भारतीय विद्यार्थ्‍यांना होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय शिक्षण व संशोधनास महत्‍व दिले आहे. माती हा थेट पिकांच्‍या उत्‍पादनाशी महत्‍वाचा घटक आहे. मातीच्या प्रकारानुसार योग्‍य पिकांची निवड करणे गरजेचे आहे. याकरिता विद्यापीठानी नागपुर येथील राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्‍थेशी सामंजस्‍य करार केला, असल्‍याचे ते म्‍हणाले.

व्‍याख्‍यानात संचालक डॉ. बी. पी. भास्कर म्‍हणाले की, मानवी आरोग्‍य हे मातीच्‍या आरोग्‍यशी निगडीत असुन दिवसेंदिवस मातीचे आरोग्‍य खालावत आहे. पिक उत्‍पादन कर‍तांना जमिनीतील विविध अन्‍नद्रव्‍याचा उपसा आणि शेतकरी बांधव विविध अन्‍नद्रव्‍याचा करिता असलेला पुरवठा यांच्‍यातील संतुलन बिघडत आहे, शाश्‍वत शेतीकरिता ही अन्‍नद्रव्‍याची तुट भरून काढणे अत्‍यंत गरजेचे आहे. मातीच्‍या आरोग्‍याविषयी जागृती करण्‍याची आवश्‍यकता असुन मातीचा कार्यक्षम वापराबाबत अधिक संशोधन करून मातीनुसार पिक पध्‍दती, स्‍थाननिहाय योग्‍य अन्‍नद्रव्‍यांचा वापर यावर भर दयावा लागेल, असे ते म्‍हणाले. 

प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. प्रविण वैद्य यांनी भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणी यांच्या वतीने शेतकरी, संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थी यांच्यासाठी माहितीपुर्ण व्याख्याने नियमित आयोजीत केली जातात असे नमूद करून याचा पदव्युत्तर संशोधन होत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ भाग्यरेषा गजभिये  यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. स्वाती झाडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री. भानुदास इंगोले, श्री. आनंद नंदनवरे, श्री. शिरीष गोरे, निखील पाटील, शुभम गीरडेकर, प्रिया सत्वधर, शुभांगी अवटे, श्री. बुद्धभुषण वानखेडे, रामप्रसाद, चेतन जोंधळे आदीसह कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी मोठया संख्‍यने उपस्थित होते.


मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थासोबत वनामकृविचा सामंजस्‍य करार

कापुस संशोधनास मिळणार पाठबळ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍था यांच्‍यात दिनांक १६ फेब्रवारी रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आला. सदर करारावर कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेचे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ अशोककुमार भारीमल्‍ला, शास्‍त्रज्ञ डॉ मनोजकुमार माहावार, शास्‍त्रज्ञ डॉ ज्‍योती ढाकणे लाड, डॉ खिजर बेग यांनी स्‍वाक्ष-या केल्‍या. यावेळी कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिका श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ व्‍ही एन नारखेडे, डॉ स्मिता सोळंकी, डॉ चिंचाणे, डॉ प्रविण कापसे आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, सदर करारामुळे दोन्‍ही संस्‍थेच्‍या कापुस पिकातील संशोधनास चालना मिळणार असुन कापुस पिकांच्‍या उत्‍पादन वाढीस मदत होईल तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी  नैसर्गिक रंगीत कापुसाचे वाण निर्मिती व कापसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव यावरही संशोधन करण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.  

सदर करारामुळे दोन्‍ही संस्‍था एकत्रित कापुस पिकांवर अत्‍याधुनिक संशोधन प्रकल्‍प राबविणार असुन यात कापुस पिकांतील यांत्रिकीकरण, मुल्‍यवर्धन, कापणीपश्‍चात प्रक्रिया, कृ‍त्रिम बुध्‍दीमत्‍तेचा वापर, पीक उत्‍पादन व संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे, नॅनो तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रात दिर्घकालीन संशोधनास चालना मिळणार आहे. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शेतकरी बांधव यांच्‍या करिता प्रशिक्षण आयोजित करण्‍यात येणार असुन दोन्‍ही संस्‍थेच्‍या कापुस पिकांबाबतची माहिती, ज्ञान व कौशल्‍य यांची देवाणघेवाण करण्‍यास मदत होणार आहे. कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍थेतील अत्‍याधुनिक प्रयोगशाळातील धागा चाचणी प्रयोगशाळेची विद्यापीठाच्‍या संशोधनास मदत होणार आहे.

मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने भरड धान्‍य पिके महत्‍वाची ...... आंतरराष्‍ट्रीय संस्‍था इक्रिसॅट येथील मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ इफेरेम हब्‍यरीमाना

डॉ इफेरेम हब्‍यरीमाना यांनी विद्यापीठातील तृणधान्‍य पिकांतील विविध संशोधन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी 

मानवी आहारात भरड धान्‍य पिकांस अधिक महत्‍व असुन इक्रिसॅट संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन बदलत्‍या हवामानानुसार जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर यांच्या सहाय्याने अधिक उत्पादक क्षमता आणि अधिक गुणवत्ता असणारी विविध तृणधान्ये पिके जसे ज्वारी, बाजरी, नाचणी आदी पिकांच्‍या विविध वाण विकसित करण्‍यात येत आहेत, असे माहिती हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्थेचे (इक्रिसॅट) मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ इफेरेम हब्‍यरीमाना यांनी दिली.

आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षाचे औचित्‍य साधुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि वनस्‍पतीशास्‍त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग परभणी शाखा यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी 'शोधाचे विज्ञान ते वितरणाचे विज्ञान' याविषयावर आयोजित विशेष व्‍याख्‍यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्ष संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ एच व्‍ही काळपांडे, सोयाबीन पैदासकार डॉ एस पी म्‍हेत्रे, सहयोगी संचालक बियाणे डॉ खिजर बेग, डॉ लक्ष्‍मण जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. इफेरेम हब्यरीमाना पुढे म्‍हणाले की, हरभरा, तुरी  आणि भुईमूग आदी पिकांच्‍या वाण निर्मितीवर इक्रिसॅट भर देत आहे. इक्रिसॅट आणि परभणी कृषी विद्यापीठ यांच्यात असलेल्या सामंजस्य करारातून कोरडवाहू क्षेत्रासाठी तृणधान्य‌ संशोधनाला चालना मिळाली असुन यातून भारतातील पहिली जैवसंपृक्‍त (बायोफोर्टिफाइड) ज्वारीचा वाण 'परभणी शक्ती' याची निर्मिती झाली., यात नेहमीच्या ज्वारीपेक्षा जास्त लोह आणि जस्त प्रमाण असल्‍यामुळे मानवी आरोग्‍यास लाभदायक आहे.   

आभासी माध्‍यमातुन मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी इक्रिसॅट आणि परभणी कृषी विद्यापीठाने बदलत्‍या हवामानास अनुकूल भरड पिकांच्‍या वाण निर्मितीवर संयुक्‍तपणे संशोधन प्रकल्‍प राबविण्‍यात यावा अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

यावेळी डॉ इफेरेम हब्‍यरीमाना यांनी विद्यापीठातील तृणधान्‍य पिकांतील विविध संशोधन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता आयोजक डॉ एच व्‍ही काळपांडे, डॉ एस पी म्‍हेत्रे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. मीना वानखाडे, डॉ. डी. जी. दळवी, डॉ. गोदावरी पवार, डॉ. एच. एच. धूतमल, डॉ. डी. के. झाटे, डॉ. अंबिका मोरे, डॉ जयकुमार देशमुख आदींसह विभागतील विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.



Saturday, February 11, 2023

अमेरिकेतील कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी आणि वनामकृवि परभणी यांच्‍यात सांमजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि अमेरिकेतील नामांकित कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍यात दिनांक १० फेब्रुवारी रोजी सांमजस्‍य करार झाला. विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत डिजिटल शेतीवर आधारीत प्रकल्‍प राबविण्‍यात येत असुन या प्रकल्‍पांतर्गत डिजिटल शेतीसंबंधीत शैक्षणिक आणि संशोधन कार्याकरिता राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील विविध नामांकित संस्‍थासोबत परस्‍पर सहकार्य प्रस्‍थापित करणे अपेक्षित आहे. या प्रकल्‍पांतर्गत दिनांक १० फेबुवारी रोजी कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित कार्यक्रमात सदर करारावर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधन उपाध्‍यक्ष मा. डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी स्‍वाक्षरी केली. या सामंजस्य कराराच्‍या माध्‍यमातुन दोन्‍ही संस्‍थेच्‍या वतीने परभणी कृषि विद्यापीठातील संशोधक, प्राध्‍यापक आणि विद्यार्थी याकरिता डिजिटल शेती तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्‍य विकासाकरिता वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करण्‍यास मदत होणार असुन अमेरिकेतील डिजिटल शेतीचे ज्ञान अवगत होणार आहे. करारामुळे दोन्‍हीही विद्यापीठातील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. तसेच राज्‍यातील व देशातील शेतीत डिजिटल करिता मनुष्‍यबळ निर्मिती करणे आणि शेतक-यांकरिता उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्‍यास मदत होणार आहे. याप्रसंगी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि आणि मा. डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी आपआपल्‍या संस्‍थेबाबत माहिती दिली. मनोगतात मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने कन्‍सस स्‍टेट युनिव्‍हर्सिटी व अमेरिकेतील नामांकित विद्यापीठासोबतचे करार हे ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगुन भविष्‍यात याचा मोठा फायदा भारतातील व महाराष्‍ट्रातील शेती विकासास होईल.

कार्यक्रमास कन्‍सस स्टेट युनिव्‍हर्सिटीतील शास्‍त्रज्ञ डॉ. वारा प्रसादडॉ. एमेस्ट मिंटनडॉ. जॅन मिडेनडॉर्फडॉ. नाझा लिलजाडॉ. ग्रँट चॅपमनडॉ. राज खोसलाकेएसयूचे डॉ. कालीरामेश सिलिवेरू आदीसह अनेक शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक उपस्थित होते. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे अमेरिकेतील नामांकित इतर विद्यापीठे नेब्रास्का विद्यापीठ, युनिव्‍हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍याशी डि‍जिटल शेती संशोधन व शिक्षण क्षेत्रात परस्‍पर सहकार्य करीता सामंजस्‍य करार करणार आहेत.








Wednesday, February 1, 2023

अनुभवात्‍मक शिक्षणातुन कृषी उद्योजक घडले पाहिजेत ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मशरूम पासुन विद्यार्थ्‍यांनी बनविलेले चविष्‍ट खाद्य पदार्थ, माननीय कुलगुरूंनी केले कौतुक 

विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता कृषि अभ्यासक्रमाच्‍या अंतिम सत्रात अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येतो, यात शेतमाल उत्‍पादन, प्रक्रिया ते त्‍यांचे विपणन याचा प्रत्‍यक्ष अनुभव विद्यार्थ्‍यांना होतो. सदर उपक्रम अधिक प्रभावीपणे राब‍वुन यातुन कृषि उद्योजक घडले पाहिजेत. मशरूम हे एक पौष्टिक व आरोग्‍यदायी पदार्थ आहे, याबाबत समाजात जागृती करण्‍याची गरजेचे असुन याचे उत्‍पादन व पुरवठा सातत्‍य पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाच्‍या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी दिनांक ३१ जानेवारी रोजी चविष्‍ट मशरूम जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ कल्‍याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषि पुरक अनेक जोडधंदे आहेत, त्‍यात युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष म्‍हणुन आपण साजरे करित आहोत, परभणी विद्यापीठाने देशातील ज्‍वारीचा पहिला जैवसपृध्‍द वाण परभणी शक्‍ती विकसित केला असुन बाजरी मधील जैवसपृध्‍द वाण एएचबी-१२०० एफई आणि एएचबी-१२६९ एफई विकसित केले. यात लोह व जस्‍त प्रमाण अधिक असुन आरोग्‍यास हितकारक आहे, याबाबत जास्‍तीत जास्‍त जनजागृती करावी लागेल.

प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, मशरूम बाबत समाजात अनेक गैरसमज असुन यात प्रथिने, पचनशील फायबर, खनिजे असतात. तर प्रास्‍ताविकात डॉ कल्‍याण आपेट यांनी मशरूम पासुन विद्यार्थ्‍यांनी बनविलेले विविध पदार्थाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी मशरूम पासुन बनविलेले चविष्‍ट पदार्थ, धपाटे, भजे, पिझ्झा, वडापाव, मशरूम बियार्णी, सैंडविच आदीं पदार्थाचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते, या पदार्थाचे मान्‍यवरांनी चव चाखली. माननीय कुलगुरू यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. विद्यार्थ्‍यांनी आरोग्‍याकरिता मशरूम यावर नाटीका सादर केली. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संदीप बडगुजर, डॉ चंद्रशेखर आबडकर, डॉ मीनाक्षी पाटील डॉ विक्रम घोळवे, डॉ. महेश दडके आदीसह विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Saturday, January 28, 2023

वनामकृवितील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहामध्‍ये जागतिक सुर्यनमस्‍कार दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहात रथसप्तमीचे औचित्य साधून दिनांक २८ जानेवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. वसतिगृहातील विद्यार्थिनी विजया पवार हिने पुढाकार घेऊन सूर्यनमस्कार संचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थींनी दुर्ग, अनुराधा, शितल, मयुरी, दक्षता सिध्दी, समृद्धी यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, वसतिगृह मुख्य अधीक्षक डॉ राजेश कदम, वसतिगृह सहायक अधिक्षक डॉ गोदावरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.





Friday, January 27, 2023

मौजे पिंगळी येथील ज्‍वारीच्‍या आद्यरेषिय पीक प्रात्‍यक्षिकांची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्राच्‍या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी मौजे पिंगळी येथील शेतकरी श्री रामकिशन पवार यांच्‍या रब्‍बी ज्‍वारीच्‍या आद्यरेषिय पीक प्रात्‍यक्षिकांतर्गत विद्यापीठ विकसित परभणी सुपरमोती या नवीन वाणाच्‍या प्रक्षेत्रास संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व प्रभारी अधिकारी डॉ एल एन जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सन २०२३ हे वर्ष संपुर्ण जगात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येत आहे. भारतीय खाद्य संस्‍कृतीत भरड धान्‍यास महत्‍व आहे परंतु काळाच्‍या ओघात आपण पाश्चिमात्‍य खाद्याचा आभारात समावेश करत आहोत. ज्‍वारी पिकामुळे मानवास खाण्यास पौष्टिक ज्वारी मिळते तर जनावरांना कडबा मिळतो. हीच जनावरे आपणास शेणखत देतात, याचा उपयोग आपणास जमिन सुपिकतेसाठी होतो. डॉ. एल. एन. जावळे यांनी रब्बी ज्वारीचे सुधारित वाण व पारंपारिक दगडी वाणामधील फरक सांगितला व इतर शेतक-यांनी पुढील हंगामामध्ये दगडी वाण घेण्याऐवजी सुधारित वाणांची पेरणी करावी असे आवाहन केले. भेटी दरम्‍यान गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.