Monday, July 25, 2022

शेतकरी देवो भव: मानुन कृषि विद्यापीठाने कार्य केले पाहिजे ...... वनामकृविचे नुतन कुलगुरू मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या कुलगुरू पदाचा मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी स्‍वीकारला पदभार 


शेतकरी स्‍वत: एक संशोधक आहे, आज अनेक प्रगतशील शेतकरी यशस्‍वी शेती करित असुन अनेक शेतकरी बांधवानी स्‍वत:च्‍या अनुभवावर आधारित चांगले कृषि तंत्रज्ञान विकसित केले आहे. अशा शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल. भारतीय संस्‍कृतीत अतिथी देवो भव: असे आपण मानतो, कृषि विद्यापीठाने शेतकरी देवो भव: मानुन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्‍हणुन दिनांक २५ जुलै रोजी मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी पदाभार स्‍वीकारला, विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्री दिपाराणी देवतराज, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ एस आर काळबांडे, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषि तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी समाधानी झाला पाहिजे, तरच समाज समाधानी राहील. विद्यापीठापुढे अनेक आव्‍हाने आहेत. आज कृषि विद्यापीठातील ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन नौकर भरती करिता प्रयत्‍न केला जाईल. विद्यापीठातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे कार्य महत्‍वाचे आहे. विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांनी स्‍वत:ची जबाबदारी प्रामाणिकपणे पुर्ण केली पाहिजे. प्रत्येकांनी स्‍वत:चा क्षमतेचा पुर्णपणे वापर केला पाहिजे. विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्‍या कौशल्‍यवृध्‍दी करिता विशेष प्रयत्‍न केले जातील. विद्यापीठ प्रशासनात प्रामाणिकता, पारदर्शकता, आणि वक्तशीरपणा यास महत्‍व दिले जाईल. कोणतेही कार्य व्‍यक्‍तीभिमुख नसले पाहिजे, यंत्रणाभिमुख असले पाहिजे. आपल्‍या दृष्‍टीकोन सकारात्मक असला पाहिजे, तरच जीवनात यश प्राप्‍त होते. परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकन वाढीवर भर देण्‍यात येणार असुन सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करू. कृषि पदवीधर हा नौकरी मिळविणारा नव्‍हे तर नौकरी देणारा उद्योजक बनला पाहिजे, याकरिता विशेष प्रयत्‍न केले जातील, यासाठी कृषि स्‍टार्ट अप, इन्‍कयुबेशन केंद्र लवकरच सुरू करण्‍यात येईल. कृषि उद्योग आणि कृषि विद्यापीठ यांच्‍यातील संबंध दृढ करण्‍याची गरज आहे. कृषि संशोधनाकरिता निधीची कमतरता असुन याकरिता जागतिक व राष्‍ट्रीय संस्‍थेकडुन विविध प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन निधी प्राप्‍त करून कृषि संशोधनास सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल.

मनोगतात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधनाबाबत तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमात नुतन कुलगुरू यांचा विद्यापीठ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी, विविध कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मा. प्रा. डॉ इन्‍द्र मणि यांचा थोडक्यात परिचय

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (संशोधन) म्हणून कार्यरत होते. प्रा. इन्‍द्र मणि यांचे कृषि यांत्रिकीकरणात मोठे योगदान असुन पिक अवशेष व्यवस्थापनकोरडवाहू शेती व भाजीपाला यांत्रिकीकरणलहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकरणे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान देशातील १८ पेक्षा जास्त राज्यांमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आजपर्यंत संशोधन मार्गदर्शक म्‍हणुन २० आचार्य आणि १२ एम. टेक. पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले असुन त्‍यांची १४० पेक्षा जास्‍त शोधनिबंध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी गठित केलेल्‍या समितीचे निमंत्रक म्हणून काम करून भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका त्‍यांनी बजावली आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डिझाइन इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. देशातील विविध क्षेत्रांसाठी विशेषतः ईशान्य प्रदेशासाठी यांत्रिकीकरण धोरण तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उत्तर प्रदेशहरियाणा आणि दिल्ली या राज्यांसह उत्तर पूर्व डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कार्यक्रमाचे समन्वयक म्‍हणुन कार्य केले आहे.

त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले असुन यात आयसीएआर - भारतरत्न सी सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारएएसएबीई युएसए प्रशस्तिपत्र पुरस्कारआयसीएफए अपोलो टायर्स पुरस्कारएमओडब्‍ल्‍युआर भूजल संवर्धन पुरस्कारआयसीएआर-जवाहरलाल नेहरू पुरस्कारआयएआरआय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. डॉ इंद्र मणि यांनी दक्षिण पूर्व आशियाउत्तर अमेरिकाआफ्रिकाजपान आणि युरोपमधील विविध देशांतील विविध संशोधन व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्‍या आहे. नवोदित उद्योग – संस्था – शेतकरी यांच्‍या संबंध विकसित करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सुमारे ४०० पेक्षा जास्‍त दत्‍तक गावात शेतक-यांचे जीवनमान सुधारणासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत मेरा गाव मेरा गौरव या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्‍हणुन कार्य केले आहे.