Friday, July 29, 2022

राष्‍ट्रीय पातळीवर परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकन उंचाविण्‍याकरिता विशेष भर देण्‍यात येईल ..... माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिपादन

परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकनात (रॅकिंग) वाढ करून पुढील पाच वर्षात देशाच्‍या पहिल्‍या वीस कृषि विद्यापीठात वनामकृविचा समावेश करण्‍याचे उद्दीष्‍ट असुन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्‍याकरिता राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शनाखाली प्रमुख उद्दिष्टांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्‍यात येईल, असे ‍प्रतिपादन नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.   

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिनांक २५ रोजी कुलगुरू पदाचा पदभार स्‍वीकारला, त्‍यानिमित्‍त दिनांक २९ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी, विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

परभणी कृषि विद्यापीठाची भविष्‍यातील दिशा याबाबत माहिती सां‍गतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिन विकासावर भर देण्‍यात येईल. कृषि पदवीधर हा नोकरी शोधणा-या नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक व्‍हावे याकरिता विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता स्‍टार्टअप सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येईल. विद्यार्थी नवोपक्रम आणि सर्जनशीलता वाढीकरिता इनक्युबेशन सेंटरची स्‍थापना करण्‍यात येईल. पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या दर्जात्‍मक वाढी करिता अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने पीएच.डी.साठी सँडविच व ड्युअल डिग्री कार्यक्रम राबविण्‍यात येईल. शास्‍त्रज्ञाच्‍या संशोधन लेख लिखाण कौशल्‍य वाढीकरिता सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्‍यात येईल. विद्यमान प्राध्यापकांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. तसेच विद्यापीठांगतर्गत असलेल्‍या खासगी महाविद्यालयाचा शैक्षणिक स्‍तर उंचाविण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील. विद्यापीठात ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन कालबद्ध पद्धतीने ही रिक्त पदांची भरती करित प्रयत्‍न केला जाईल. राज्याच्या विशिष्ट संशोधन गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य क्रम निश्चित करून कार्य करण्‍यात येईल, यात कोरडवाहू शेती, मूल्यवर्धन, सोयाबीन, कापुस आणि अद्रक यांत्रिकीकरण भर देण्‍यात येईल. ड्रोनचा कृषि क्षेत्रात वापराबाबत परभणी कृषि विद्यापीठ देशात सर्वोकृष्‍ट करण्‍याचा मानस असुन कृषि संशोधनाची गती वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल. शेतक-यांच्‍या बांधावर कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोह‍चविण्‍यासाठी मेरा गांव मेरा गौरव याधर्तीवर विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येईल. आधुनिक माहिती तंत्रज्ञान वापर करून कृषी विस्तार सेवांमध्ये कार्यक्षमता आणि प्रभावी बदल करण्‍यात येईल. प्रगतशील व यशस्‍वी शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या आधारे अनेक तंत्रज्ञान विकसित करतात. अशा शेतक-यांना प्रोत्‍साहित करून विद्यापीठ फेला म्‍हणुन निवड करून संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल. शेतकऱ्यांच्या सहभागाने विद्यापीठ बियाणे उत्पादन वाढी करिता प्रयत्‍न करेल. डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पारदर्शक, विश्वासार्ह आणि वक्‍तशीर विद्यापीठ प्रशासन करण्‍याचा प्रयत्‍न राहील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी  केले तर आभार विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्रा डि एफ राठोड, डॉ आशाताई देशमुख, प्रा चव्‍हाण आदीसह विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पत्रकार परिषदेस प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी, संपादक, पत्रकार बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची विद्यापीठाबाबतची भविष्यातील दिशा -Vision of Honble VC

 कृषि शिक्षण

  • विद्यापीठाचे मानांकनात (रॅकिंग) वाढ करून पुढील पाच वर्षात देशाच्‍या पहिल्‍या वीस कृषि विद्यापीठात वनामकृविचा समावेश करण्‍याचे उद्दीष्‍ट
  • राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्‍याकरिता राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शनाखाली प्रमुख उद्दिष्टांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करणे.
  • कृषि पदवीधर नोकरी शोधणा-या नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक व्‍हावे याकरिता विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता स्‍टार्टअप सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येईल.
  • विद्यार्थी नवोपक्रम आणि सर्जनशीलता वाढीकरिता इनक्युबेशन सेंटरची स्‍थापना करण्‍यात येईल.
  • कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिन विकासावर भर देण्‍यात येईल.
  • पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या दर्जात्‍मक वाढी करिता अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने पीएच.डी.साठी सँडविच / ड्युअल डिग्री प्रोग्राम राबविणे येईल.
  • शास्‍त्रज्ञाच्‍या संशोधन लेख लिखाण कौशल्‍य वाढीकरिता सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्‍यात येईल.
  • विद्यमान प्राध्यापकांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल, पीएचडी नसलेले प्राध्‍यापकांकरिता शक्यतो परदेशातून पीएचडी करण्‍याकरिता प्रात्‍साहित करण्‍यात येईल.
  • विद्यापीठांगतर्गत असलेल्‍या खासगी महाविद्यालयाचा शैक्षणिक स्‍तर उंचाविण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील.

कृषि संशोधन

  • विविध संख्‍येच्‍या सहयोगाने, नवनवीन उपक्रमाद्वारे कृषि संशोधनातील गुणवत्ता, उत्पादकता आणि प्रभाव सुधारणे विशेष लक्ष देण्‍यात येईल.
  • कृषी आणि संलग्न विज्ञानांच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीसह द्विपक्षीय आणि बहु-पक्षीय संशोधन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल.
  • कृषि तंत्रज्ञानाचे व्यापारीकरणाकरिता संशोधन स्तरावर विविध उद्योगांचे सहकार्य तसेच उद्योगाकडून निधी प्राप्‍त करण्‍यात येईल.  विविध उद्योग समुहाशी करार करून संशोधन आणि विकास निधी मिळविण्‍यावर भर देण्‍यात येईल.
  • विद्यापीठासाठी मोठ्या बाह्य निधीला मिळविण्‍यासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षीत करण्‍यात येईल.
  • राज्याच्या विशिष्ट संशोधन गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य क्षेत्रामध्ये (कोरडवाहू शेती, मूल्यवर्धन, सोयाबीन यांत्रिकीकरण) उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of Excellence) स्थापना केली जाईल.
  • काटेकोर शेती, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, सेंद्रिय शेती आणि हवामान अनुकुल शेती यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्‍यात येईल.
  •  कृषि संशोधनाची गती वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

विस्‍तार शिक्षण

  •  शेतक-यांच्‍या बांधावर कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोह‍चविण्‍यासाठी मेरा गांव मेरा गौरव याधर्तीवर विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येईल.
  • आधुनिक माहिती तंत्रज्ञान (ICTs) वापर करून कृषी विस्तार सेवांमध्ये कार्यक्षमता आणि प्रभावी बदल करण्‍यात येईल.
  • शेतकऱ्यांच्या विविध शेती विषयक प्रश्नांचे निवारण करणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
  • राज्‍यातील कृषि विभाग आणि विविध संबंधित संस्‍थेसोबत एकत्रित कार्य करून विविध कृषि विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येईल.
  • प्रगतशील व यशस्‍वी शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या आधारे अनेक तंत्रज्ञान विकसित करतात. अशा शेतक-यांना प्रोत्‍साहित करून विद्यापीठ संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल.
  • शेतकऱ्यांच्या सहभागाने बियाणे उत्पादन वाढी करिता प्रयत्‍न केला जाईल.
  •  प्रशासकीय
  • डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पारदर्शक, विश्वासार्ह आणि वक्‍तशीर विद्यापीठ प्रशासन करण्‍याचा प्रयत्‍न राहील.
  • विद्यापीठात ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन कालबद्ध पद्धतीने ही रिक्त पदांची भरती करित प्रयत्‍न केला जाईल.
  • अध्यापन, संशोधन, विस्तार आणि प्रशासनात नैतिकता आणि मूल्यांवर अधिक भर दिला जाईल.