Tuesday, July 26, 2022

शेतीक्षेत्रात ड्रोन वापराबाबत एसओपी निश्चित करण्‍यासाठी राष्‍ट्रीय समितीची स्‍थापना

वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची अध्‍यक्षपदी नियुक्‍ती


शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात उत्‍सुकता असुन किटकनाशकांच्‍या फवारणीसाठी ड्रोनचा वापर भविष्‍यात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तसेच तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक विमा करिता ड्रोन चा वापर होणार आहे. या ड्रोन वापराबाबत राष्‍ट्रीय पातळीवर मानक कार्य पध्दती (एसओपी) निश्चित करण्‍यासाठी देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागाच्‍या वतीने उच्‍चस्‍तरीय समितीचे गठण करण्‍यात आले असुन या समितीच्‍या अध्‍यक्षपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मा डॉ इन्‍द्र मणि यांचा कृषि ड्रोन बाबत मोठा अभ्‍यास असुन त्‍याचा कृषि ड्रोन बाबत राष्‍ट्रीय धोरण ठरविण्‍यासाठी लाभ होणार आहे. सदरिल समिती पीकनिहाय ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या वापरासाठी मानक कार्य पध्‍दतीचा (एसओपी) मसुदा तयार करून दिनांक ३० सप्‍टेंबर पर्यंत देशाच्‍या कृषि मंत्रालयास सादर करणार आहे. सदर समिती शेतीतील निविष्‍ठा व तंत्रज्ञानाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर यावर अभ्‍यास करून एसओपी निश्चित करेल. समितीत देशातील तज्ञ मंडळीचा समावेश असुन यात नवी दिल्‍ली येथील कृषि मंत्रालयातील उपायुक्‍त इं‍जि. एस आर लोही हे सदस्‍य सचिव असुन समितीत पिक संरक्षण विभागाच्‍या डॉ अर्चना सिन्‍हा, आयसीएआरचे डॉ आर एन साहु, राहुरी कृषि विद्यापीठाचे डॉ सुनिल गोरंटीवार, गुंटुर येथील डॉ ए सामभाय, आयएआरआयचे डॉ दिलीप कुशावाह, कोईम्‍बतुर येथील डॉ एस पाझानिवेलन, हैद्राबाद येथील किटकशास्‍त्रज्ञ डॉ रामगोपाल वर्मा आदींची समावेश आहे.