फळपिकांचे गुणवत्तायुक्त बियाणे आणि रोपे उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध... कुलगुरू मा.प्रा. (डॉ.)इन्द्र मणि
वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेच्या २९व्या भागाचे आयोजन करण्यात आले. ‘आंबा मोहोराचे संरक्षण’ या विषयावर आधारित हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रामध्ये फळ पिकावर संशोधन करण्यासाठी इंडो – इस्राईल प्रकल्प कार्यान्वित असून त्यास बळकटी देवून उत्कृष्ट करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत आहे. याबरोबरच परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची अनेक वर्ष पासून पडीक असलेली १०० हेक्टर जमीन फळबाग लागवडीसाठी
यावर्षी तयार केली आहे. या जमिनीवर लागवड करण्यासाठी लखनऊ, बंगळूर, आयोध्या,
दापोली आदी ठिकाणाहून आंबा,ॲव्होकॅडो,आवळा, बेल यासह इतर महत्वाच्या फळझाडांची ५० हून अधिक जातीची चाळीस हजार रोपटी मागविण्यात आली
आहेत. या
फळबागेतून विविध प्रकारचे संशोधन करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यापारी लागवड साध्य करून निर्यातक्षम फळ उत्पादने घेण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना निर्यातक्षम फळ पिकांचे तंत्रज्ञान देण्यात येईल. यासाठी अयोध्या येथून काही फळपिकाची रोपे आणलेली आहेत. शेतकऱ्यांना फळपिकांचे गुणवत्ता युक्त बियाणे आणि रोपे उपलब्ध करून देण्यासाठीही विद्यापीठ कटिबद्ध आहे. या रोपांच्या लागवडीसाठी केवळ तंत्रज्ञान देऊन विद्यापीठ थांबणार नाही, तर ते तंत्रज्ञान अवलंबण्यासाठी मानके ठरवून देण्यात येतील. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर केवळ झाडे लावण्यावर भर न देता
अधिकाधिक बागा म्हणजेच क्षेत्रावर लागवड करण्याच्या सूचनाही यावेळी शास्त्रज्ञाला त्यांनी दिल्या. आज ३१ डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस असून देखील विद्यापीठाचे शास्त्रज्ञ “शेतकरी देवो भव:” या भावनेतून ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद करत आहेत. याबद्दल मा कुलगुरू यांनी समाधान व्यक्त करून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. याबरोबरच कार्यक्रमात सर्व सहभागी शास्त्रज्ञांना आणि शेतकरी बंधूंना यावेळी नवीन वर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांनी आंबा मोहोराच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मोहोर फुटण्याची अवस्था, मोहोर फुलण्या आधीच्या आणि नंतरच्या अवस्थेचे व्यवस्थापन, मोहोरावरील अळीचे व करपा
रोगाचे व्यवस्थापन, ढगाळ वातावरणात आंबा मोहोर व्यवस्थापन यावर भर दिला.
कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास २०० शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आंबा लागवड पद्धती, आंतरपीक, आंबा पिकाची छाटणी, आंब्याच्या कलम करण्यासाठी माळी मिळेल का? आंब्याची कलम रोपांची किंमत, गावरान आंब्याची कोय सप्टेंबर मध्ये लागवड केली असून त्याच्यावर इन सिटू ग्राफ्टिंग करण्याकरिता कालावधी योग्य कोणता? आंब्यावरील गुच्छ रोगासाठी काय करावे, आंबा फवारणीचे वेळापत्रक कसे करता येईल, पाऊस जास्त पडल्यानंतर अंतर मशागतीसाठी खर्च कमी कसा करावा, मोहरगळ थांबवण्यासाठी उपाय, चार वर्षाची बाग आहेत त्याच्यात आंतरपीक कोणते घ्यावी, नैसर्गिक आपत्तीमध्ये अंबागळ झाल्यास त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे, छाटणी करणारा तज्ञ मिळेल का? चार वर्षाची बाग आहे सहा बाय दहा अंतर आहे यामध्ये आंतरपीक कोणते घ्यावे, असे विविध
महत्वपूर्ण प्रश्न विचारले त्यास विस्तार शिक्षण संचालक तथा आंबा तज्ञ डॉ. जी. एम. वाघमारे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक, डॉ. मिनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन आणि आभार सह समन्वयक तथा वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती. सारिका नारळे यांनी केले.