Saturday, December 27, 2025

हवामान बदल हे ‘न्यू नॉर्मल’; कोरडवाहू शेतीचे नव्या परिस्थितीनुसार पुनर्नियोजन आवश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत उजळंबा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प तर्फे राबविण्यात येत असलेल्या हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रमाच्या (NICRA) अंतर्गत मौजे उजळंबा (ता. जि. परभणी) येथे दिनांक २५ डिसेंबर २०२५  रोजी शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर–क्रिडाहैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद उपस्थित होते. व्यासपीठावर बाभुळगावचे सरपंच श्री शिवाजी दळवे, सोन्नाचे सरपंच श्री आवडाजी गमे, उजळंबाचे सरपंच श्री प्रभाकर मोगले, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. पापिता गौरखेडे, डॉ. अनंत लाड, प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानेश्वर पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवत असून अतिवृष्टी, अल्पवृष्टी, अनिश्चित पर्जन्यमान आणि तीव्र हवामान घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात या बाबी ‘न्यू नॉर्मल’ ठरत असून मराठवाड्यासारख्या कोरडवाहू प्रदेशात पीक व पीकपद्धती, संपूर्ण शेती व्यवस्था, पशुधन तसेच संबंधित व्यवस्थापन नव्या परिस्थितीनुसार नियोजित करणे अत्यावश्यक आहे. ते पुढे म्हणाले की कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना असून दुग्धव्यवसाय, फळपिके, यांत्रिकीकरण, उपलब्ध सिंचन पाण्याचा अचूक व कार्यक्षम वापर, मृद व जलसंधारण तसेच हवामानशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास शाश्वत उत्पादन शक्य होईल.

माननीय कुलगुरूंनी सांगितले की नवीन सर्वसमावेशक योजना ‘जी राम जी’ अंतर्गत मृद व जलसंधारण, पाणी साठवण, पायाभूत सुविधा, बाजारपेठेशी निगडित व्यवस्था, रस्ते सुविधा तसेच हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA) अंतर्गत विकसित तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच शेतीमध्ये महिलांचे योगदान लक्षणीय असून प्रत्येक परिवारात स्त्री ही शेतीच्या केंद्रस्थानी असून महिलांमुळेच घरातील एकोपा टिकून राहतो. मूल्यवर्धन व काढणीपश्चात प्रक्रिया (Post-harvest processing) यामध्ये महिलांची कार्यक्षमता व विचारशक्ती प्रभावीपणे वापरता येईल, असेही त्यांनी अधोरेखित केले. याबरोबरच शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा पालक व प्रचारक आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शेतकरी-केंद्रित संशोधन व विस्तार उपक्रम विद्यापीठ शेतकरी देवो भवः’ या भावनेतून राबवत आहे. येणाऱ्या काळात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतात. त्यामुळे कोरडवाहू शेती करताना शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त प्रमाणात आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात थेट शेतकऱ्यांच्या शेतावर संशोधन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक डॉ. विनोद कुमार सिंह यांनी सांगितले की, हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषि उपक्रम (NICRA) गावांतील शेतकरी हे यशस्वी तंत्रज्ञानाचे ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांनी त्याचा प्रसार करावा. सौरऊर्जा, बेड पद्धतीने उच्च घनता कापूस लागवड व संपूर्ण यांत्रिकीकरणावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले. कोरडवाहू शेतीत पशुधनाचे महत्त्व लक्षात घेऊन पशु आरोग्य, निवारा व पोषणाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अवजारे बँक, बियाणे बँक व बैलचालित अवजारांचा प्रसार करण्यावर भर दिला. महिलांनी जैविक निविष्ठा व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून अर्थार्जन करावे असेही त्यांनी आवाहन केले.

प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी सांगितले की कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी स्वतः वापरावेच, परंतु त्याचा इतर शेतकऱ्यांपर्यंतही प्रसार करावा.

यावेळी निक्रा (NICRA) गावांतील श्री. आवडाजी गमे, श्री. प्रभाकर मोगले आणि श्री. ज्ञानेश्वर माऊली पारधे या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. आंतरपीक पद्धत, सुधारित वाण — जसे तूर पिकाचा बी.डी.एन. ७१६ तसेच सोयाबीन पिकाचे एम.ए.यु.एस. ६१२ व ७२५ — हे वाण अधिक उत्पादन देणारे ठरल्याचे त्यांनी सांगितले. बीबीएफ (रुंद वरंबा–सरी) पद्धत आणि बेड पद्धतीमुळे कमी व जास्त पावसाच्या परिस्थितीतही उत्पादनात वाढ होत असल्याचे तसेच पशुधनासाठी सुरक्षित निवारा व पौष्टिक चाऱ्याचे महत्त्व असल्याचे शेतकऱ्यांनी अधोरेखित केले.

याप्रसंगी श्री. ज्ञानोबा पारधे यांच्या बीबीएफ वरील हरभरा पिकास तसेच विहीर पुनर्भरण संचास आणि श्री. गजानंद साखरे यांच्या बेडवरील तूर पिकास मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गणेश गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमास शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पातील श्री. सादिक शेख, श्री. एस. पी. काळे, श्री. व्ही. जे. रिठे, श्री. संतोष धनवे, श्री. सुरेश खटिंग व श्री. मंगेश राऊत यांनी परिश्रम घेतले.










Friday, December 26, 2025

कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी संशोधन, तंत्रज्ञान व समन्वय आवश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद दिनांक २५ डिसेंबर रोजी माननीय कुलगुरू यांच्या बैठक दालनात पार पडला. या संवादादरम्यान कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान, कोरडवाहू शेतीतील समस्या तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या संवाद सत्राच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर– क्रीडा, हैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ. प्रफुल घंटे, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे, डॉ.किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना आहे. या शेती पद्धतीमध्ये कोरडवाहू फळपिके, पशुधनाची जोड म्हणजेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मृद व जलसंधारण, यांत्रिकीकरण, कृषी सिंचनशास्त्र तसेच हवामानशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, अनिश्चित व असमतोल पर्जन्यमान, कधी पावसाचे दीर्घकालीन खंड तर कधी अतिपाऊस व अतिवृष्टी, जमिनीचे ढासळलेले आरोग्य, जमिनीची होणारी धूप, नैसर्गिक संसाधनांची झालेली घट तसेच वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू शेतीचे अधिक प्रमाण असलेल्या प्रदेशात शेती अधिकाधिक जोखमीची होत असताना, कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतीपूरक जोड व्यवसायांची जोड, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग तसेच शासन व संशोधन संस्थांमधील सुसूत्र समन्वय हाच शेतीच्या शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू यांनी केले.

संचालक डॉ. विनोद कुमार सिंह म्हणाले की, आजच्या काळात कोरडवाहू शेती ही केवळ कमी पावसावर अवलंबून असलेली शेती न राहता ती हवामान बदलाच्या थेट परिणामांना सामोरे जाणारी शेती बनली आहे. पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी–अल्पवृष्टीची चक्रे, तापमानातील वाढ, मृदेतील सेंद्रिय घटकांचे कमी झालेले प्रमाण, जलस्रोतांची घट आणि निविष्ठांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम (NICRA) कोरडवाहू शेतीला नवदिशा देणारा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरडवाहू शेती क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे शेती उत्पादनक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली असून सरासरी उत्पादनात १.२ ते २.४ टन प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या उत्पादनक्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी वैज्ञानिक व क्षेत्रनिहाय प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, क्षेत्रनिहाय (Area-specific) नियोजन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक भागाच्या हवामान, माती व सामाजिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञान व उपाययोजना राबविल्या पाहिजेत. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा व तंत्रज्ञानाचा राज्य व जिल्हा स्तरावर प्रभाव (Impact Assessment) मोजला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सिंह यांनी कोरडवाहू शेतीसाठी संशोधन, विकास व विस्तार क्षेत्रात पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता दर्शविली. संशोधन व विस्तार उपक्रम हे शेतकरी-केंद्रित असावेत तसेच शेतकऱ्यांच्या गरजांशी सुसंगत असले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात शेतकरी समुदायासाठी उपयुक्तता (Relevance to Farming Community) ही केंद्रस्थानी ठेवून कार्य करणे गरजेचे आहे. याबरोबरच गावपातळीवर कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून देण्यावर भर दिला. नव्या यंत्रांची प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान स्वीकार वाढवावी व यासाठी संस्था सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. मृदा आरोग्याबाबत त्यांनी गंधक, जस्त व बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याने मृदा तपासणीवर आधारित खत वापर आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मका पिकाच्या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, कॉम्पोझिट मक्यासाठी सुमारे ७५ कि.ग्रॅ. तर संकरीत मक्यासाठी सुमारे १५० कि.ग्रॅ. खत लागते, त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च–उत्पन्नाचा विचार करून योग्य पर्याय निवडावा,असा सल्ला दिला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी बीटी कापूस व्यवस्थापन, करडई तेलाचे पोषणमूल्य आणि जमिनीच्या खोलीनुसार योग्य ज्वारी वाणांची निवड यावर मार्गदर्शन केले. संशोधनाधारित पीक नियोजन केल्यास उत्पादन व उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे, तसेच रुंद वरंबा-सारी पद्धत, कमी कालावधीचे वाण व फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता तपासणे हा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन व पूरक व्यवसाय जोडल्यास उत्पन्न अधिक स्थिर राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. श्री. सुनील शेळके यांनी कृषि तंत्रज्ञान अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम विस्तार उपक्रम व माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. राजेश मगर यांनी बीबीएफ (रुंद वरंबा–सरी) तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे तसेच सोयाबीनचे एमएयुएस-७२५, एमएयुएस-६१२ व किमया हे वाण चांगले आढळल्याचे नमूद केले. श्री. रमाकांत पोशेट्टी यांनी कोरडवाहू शेतीसोबत पशुधनाची जोड व त्यासाठी संरक्षित जागा व पौष्टिक चारा आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. गजानन अंभोरे यांनी कमी व जास्त पावसातही बेड पद्धतीमुळे उत्पादन वाढल्याचे सांगितले.

यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यानंतर मान्यवरांनी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रासह विद्यापीठाच्या विविध केंद्रांना भेट दिली. आंतरपिक पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व शेततळे यावरील संशोधन प्रयोगांची माहिती डॉ. आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड व डॉ. पापिता गौरखेडे यांनी दिली.

बायोमिक्स उत्पादन व संशोधन केंद्रात डॉ. चंद्रशेखर आंबाडकर यांनी बायोमिक्स निर्मिती, वापर व प्रसाराबाबत माहिती दिली. सिंचन जल व्यवस्थापन प्रकल्पातील अमृत सरोवर (शेततळे), सौरपंप, ठिबक सिंचन व तूर प्रक्षेत्रास भेट देण्यात आली, तसेच त्रिशूल तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. हवामान वेधशाळेत दीर्घकालीन हवामान बदल व त्याचा शेतीवरील परिणाम याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. हरीश आवारी, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. पी. व्ही. पडघन, डॉ. अंबिका मोरे, डॉ. अनंत लाड, डॉ. राजेश धुतमल, डॉ. सवाई यांच्यासह विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील श्री एस. पी. काळे, श्री व्ही. जे. रिठे, श्री संतोष धनवे, श्री सुरेश खटिंग, श्री. मंगेश राऊत व श्री सादिक शेख यांनी परिश्रम घेतले.













वनामकृविचा ७८ वा शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन संवाद : ऊस लागवडीत नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ‘शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचा ७८ वा भाग दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडला. विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्र, गांधेली (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव (अहिल्यानगर) येथील विषयतज्ज्ञ डॉ. नारायण निंबे यांनी सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञानया विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. निंबे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी पारंपारिक तीन डोळा लागवड पद्धतीऐवजी एक डोळा लागवड पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन, योग्य बेणे निवड, ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर यावर भर देण्याचे आवाहन केले. सध्या अनेक शेतकरी कोकोपीट व ट्रे पद्धतीने रोपे तयार करतात; मात्र त्याऐवजी कमी खर्चाची, सोपी व परिणामकारक सुपर केन नर्सरी पद्धत अवलंबण्याची शिफारस त्यांनी केली.

सुपर केन नर्सरीसाठी सपाट गादीवाफे तयार करून त्यावर रिकाम्या खतांच्या गोण्या पसरवाव्यात. त्यावर शेणखत, पोयटा माती व गांडूळ खत यांचे एकास एक प्रमाणातील मिश्रण तीन इंच जाडीने टाकावे. बेणे निर्मितीसाठी ९ ते ११ महिने वयाचा ऊस निवडावा. खोडवा ऊस तसेच अतिजुना ऊस बेण्यासाठी वापरू नये. शेंड्याकडील भाग व बुडाकडील ३४ पेरे वगळून उर्वरित ऊस वापरावा.

एक किंवा दोन डोळे असलेले बेणे ओळीमध्ये अंथरून १ ते २ सेंमी अंतर ठेवावे. त्यावर मिश्रण भरून पाचट किंवा प्लास्टिकचे आच्छादन करावे. साधारण एक आठवड्यानंतर उगवण दिसू लागल्यावर आच्छादन काढावे. या पद्धतीने एका महिन्यात निरोगी व मजबूत रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात. खतांच्या गोण्यांमुळे रोपे सहजपणे काढता येतात तसेच ऊसातील गवताळ वाढ ही विकृती रोखण्यास ही पद्धत उपयुक्त ठरते.

ऊस लागवड करताना खोल सरीऐवजी सहा इंच खोलीच्या सरीचा अवलंब करावा. एका एकरात सुमारे १५ हजार रनिंग फूट सरी उपलब्ध होऊन १५ हजार एक डोळ्यांचे बेणे वापरता येते. यामधून साधारण ९० हजार फुटवे निर्माण होतात. काढणीपर्यंत ४० ते ५० हजार फुटवे टिकले तरी एकरी ८० ते ९० टन उत्पादन मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात खोडवा ऊस व्यवस्थापनावर कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. काकासाहेब सुकासे यांनी मार्गदर्शन केले. चांगल्या उत्पादनासाठी खोडवा उसाची बुडखा छाटणी करून छाटलेल्या बुडख्यावर एक लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बेन्डाझिम व ०.३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) मिसळून फवारणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच ऊस काढणीनंतर शेतात राहिलेले पाचट न जाळता सर्व सऱ्यांमध्ये आच्छादनासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाच्या वतीने शेतकरीशास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रमांतर्गत डिसेंबर २०२५ महिन्यात कृषि विज्ञान केंद्र गांधेली मार्फत प्रत्येक शुक्रवारी विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मृदा आरोग्य डॉ. हरिहर कौसडीकर, कीड व रोग नियंत्रण श्री. तुषार चव्हाण, तसेच मोसंबी व आंबिया बहार व्यवस्थापन डॉ. एस. आर. पाटील व डॉ. पं. दे. कृषि विद्यापीठ, अकोला यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. चौथ्या शुक्रवारी सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान या कार्यक्रमाने डिसेंबर महिन्यातील उपक्रमाचा समारोप झाला.

सदर कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालनालयाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राच्या संपूर्ण टीमने विशेष योगदान दिले.


Wednesday, December 24, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी सिद्धी रासवे हिचे ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२५’ मध्ये घवघवीत यश

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी सिद्धी संतोष रासवे हिने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑफलाईन व ऑनलाइन ‘चित्रकला स्पर्धा २०२५’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने गट ‘ब’ — जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. अशा भव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणे हे कुमारी सिद्धीच्या कलागुणांचे आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे प्रतीक आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभागप्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. वीणा भालेराव, डॉ. नीता गायकवाड, डॉ. शंकर पुरी, शिक्षकवृंद, अधिकारी, कर्मचारी तसेच मित्रमैत्रिणींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना देणारी असून, कुमारी सिद्धीच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.


वनामकृविच्या जिरेवाडी येथील कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या बांधकाम प्रगतीचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी घेतला आढावा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा जिरेवाडी (ता. परळी, जि.बीड) येथे उभारण्यात येत असलेल्या कृषि  महाविद्यालय (COA) व कृषि  व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय (COABM) यांच्या बांधकाम कामांची प्रगती पाहण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान बांधकामाची सद्यस्थिती, स्तंभ, स्लॅब, आरसीसी संरचना, साहित्य गुणवत्ता, सुरक्षितता उपाययोजना तसेच कामाच्या वेळापत्रकाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माननीय कुलगुरूंनी कामाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगून निर्धारित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या महाविद्यालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृषि  शिक्षण व कृषि  व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल, असे सांगून याद्वारे स्थानिक विद्यार्थ्यासह मराठवाड्यातील कृषि  शिक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेश चौहान, उपविद्यापीठ अभियंता श्री. डी. डी. टेकाळे हे उपस्थित होते. त्यांनी माननीय कुलगुरूंना कामाच्या सद्य प्रगतीची माहिती दिली व येत्या कालावधीत होणाऱ्या टप्प्यांची रूपरेषा सादर केली.







वनामकृविद्वारा हळद काढणीपूर्व व पश्चात व्यवस्थापनावर तुळजापूर वाडी (ता. वसमत ) येथे एकदिवसीय प्रशिक्षण

 हळद पिकात यांत्रिकीकरण, प्रक्रिया व निर्यातीवर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळद काढणीपूर्व व काढणीपश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन’ प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विस्तार कृषी विद्यावेता डॉ. गजानन गडदे व हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. राजेंद्र कदम हे उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती कमलबाई गंगाबुवा गिरी,  उपसरपंच श्रीमती आशा अनंतराव चव्हाण, पोलीस पाटील श्री. सचिन गुलाबराव चव्हाण, श्री. सुनील भिसे (ता.कृ.अ. वसमत), श्री. अजय सुगावे (विषयतज्ञ कीटकशास्त्र, केविके, तोंडापूर), श्री. गजानन वरुडकर (सुपरवायझर वसमत), श्री. एकनाथ चव्हाण, सदस्य ग्रामपंचायत व श्री. सुरेश निवृतीराव चव्हाण प्रगतशील शेतकरी हे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे विशेष कौतुक करत हळद पिकाचे आर्थिक, औद्योगिक व निर्यातक्षम महत्त्व सविस्तरपणे विशद केले. हळद पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब, शेतकरी उत्पादक कंपनीची (FPO) निर्मिती, काढणीपश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धनासाठी हळद उत्पादक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण तसेच गावागावांमध्ये प्रक्रिया उद्योगांची स्थापना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल व ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच भारत देश कृषीसाठी प्रसिद्ध होता, आहे आणि पुढेही कृषीसाठीच प्रसिद्ध राहील, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती व बाजाराभिमुख शेतीचा अवलंब करून उत्पादनक्षमता आणि उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. कृषी ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

प्रास्ताविकामध्ये डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी हळद पिकाचे महत्व व मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांनी विद्यापीठांतर्गत विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे सांगितले. 

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेश क्षीरसागर यांनी हळद पीक काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यवर्धन यावर मार्गदर्शन करत बचत गटामार्फत विविध घरगुती सूक्ष्म व लघु उद्योगातून आर्थिक सक्षम बनवण्याकरिता शेतकरी गट व महिला बचत गट स्थापन करून हळद प्रक्रिया उद्योगास चालना देण्याबाबत आवाहन केले. तसेच डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळद पिक किड व्यवस्थापन, तर डॉ. आनंद दौंडे यांनी हळद पीक रोग व्यवस्थापन विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. एस. जे. खंडागळे व उद्यानविद्या महाविद्यालयातील अंतिम सत्रातील विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन वैष्णवी शितळे व नम्रता गिरी या विद्यार्थिनींनी केले तर आभार  सहाय्यक अन्वेषक डॉ. अंशुल लोहकरे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी मौजे तुळजापूर वाडी येथे २०० हून अधिक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





कडधान्ये उत्पादन, प्रक्रिया व मूल्यसाखळी विकासासाठी वनामकृवि (VNMKV) आणि – आयपीडीए (IPDA) यांच्यात सामंजस्य करार

कडधान्ये मूल्यसाखळी सक्षम करणारा सामंजस्य करार — मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


भारतामध्ये कडधान्ये ही आहाराचा, पोषणाचा आणि शेती व्यवस्थेचा कणा आहेत. प्रथिने, तंतुमय घटक व  सूक्ष्म पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेली कडधान्ये जमिनीची सुपीकता वाढवतात तसेच पर्यावरणावरील ताण कमी करतात. मात्र, जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक व आयातदार असूनही भारतातील कडधान्य क्षेत्राला कमी उत्पादनक्षमता, तुटक मूल्यसाखळी, मर्यादित प्रक्रिया उद्योग आणि आयातीवरील वाढते अवलंबित्व अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र हे कडधान्य उत्पादनात आघाडीवर असले तरी शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे आणि आधुनिक प्रक्रिया सुविधांचीही कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर कडधान्येच्या उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ विकासासाठी शेतकरी व संबंधित घटकांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

हा करार मराठवाड्यातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृतीत उच्चांकी ३.२१ गुणांसह ‘ए-ग्रेड’ उत्कृष्ट मानांकन प्राप्त करणारे अग्रगण्य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राज्य शासनाच्यामाननीय बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART)’ प्रकल्प अंतर्गत आणि जागतिक बँकेच्या सहाय्याने कार्यरत असलेल्या घडवण्यासाठी इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशन’ (IPDA), धाराशिव यांच्यात करण्यात आला आहे.

हा करार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता तथा बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनटक्के,  इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव श्री. विनायक पाटील, सदस्य डॉ. शुभ्रा मिश्रा देशपांडे, अंजली उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, या सामंजस्य करारामुळे मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील कडधान्ये उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादनक्षमता वाढेल, उत्पादन खर्चात घट होईल आणि शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. सुधारित वाणांचा प्रसार, आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बाजारपेठेशी थेट जोड निर्माण झाल्यामुळे कडधान्ये प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल. यामुळे उत्पादन ते विपणनपर्यंतची संपूर्ण डाळ मूल्यसाखळी अधिक सक्षम, कार्यक्षम आणि एकात्मिक होईल. शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल. यासाठी विद्यापीठ विकसित तुरीचा गोदावरी वाण महत्वाचा ठरेल. हा करार आत्मनिर्भर भारत अभियान, शाश्वत शेती विकास आणि २०४७ पर्यंत विकसित भारत या राष्ट्रीय उद्दिष्टांना पूरक असून शेती क्षेत्राला आधुनिकतेकडे नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या कराराअंतर्गत देशभरातील डाळींच्या मूल्यसाखळीतील विविध घटकांसाठी संयुक्त क्षमता बांधणी उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये कडधान्ये उत्पादन, प्रक्रिया तंत्रज्ञान, सुधारित वाणांचा प्रसार, शाश्वत शेती पद्धती, हवामान बदलाशी जुळवून घेणे, कीड व रोग व्यवस्थापन, दर्जा नियंत्रण, बीज उपलब्धता, बाजार संलग्नता आणि डिजिटल माहिती प्रणाली या विषयांचा समावेश असेल. या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, अभ्यासदौरे व संशोधन उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

या उपक्रमांमध्ये शेतकरी उत्पादक संघटना (FPO), शेतकरी गट, कृषी विस्तार अधिकारी, प्रक्रिया उद्योग, व्यापारी, निर्यातदार, इनपुट पुरवठादार आणि संशोधन संस्था यांचा सहभाग असेल. विद्यापीठ तांत्रिक व शास्त्रीय मार्गदर्शन प्रदान करेल, तर इंडो पल्सेस डेव्हलपमेंट क्षेत्रस्तरावर अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडेल.

या करारातून निर्माण होणारी बौद्धिक संपदा (Intellectual Property) दोन्ही संस्थांची संयुक्त मालकी राहील. संशोधन निष्कर्षांचे प्रकाशन, पेटंट नोंदणी आणि व्यावसायिक वापर हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या  मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाणार आहेत.

हा करार विद्यापीठातर्फे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि इंडो पल्सेस डेव्हलपमेंट असोसिएशनचे तर्फे अध्यक्ष श्री. नारायण नन्नवरे यांनी स्वाक्षरी करून अधिकृत केला.