Friday, November 7, 2025

वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” मोठ्या उत्साहात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सामूहिक गायनाने झाली, ज्यामुळे वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारून गेले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. राजेश कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत हे केवळ राष्ट्रीय गान नसून भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रेरणास्थान आहे. या गीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर “वंदे मातरम्” महोत्सव कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना “विकसित भारत २०४७या ध्येयाशी जोडून कार्य करण्याचे आवाहन करत सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये विकसित करून नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे शेती आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी समन्वयनासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. वैशाली भगत आणि प्रभारी शिक्षण अधिकारी डॉ. आनंद दवंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. विद्याधर मनवर, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, आणि डॉ. सुबोध खंडागळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रीमती लोंढे, श्रीमती शमा पठाण, श्री. एजाज शेख, श्री. अभिजित देशमुख, श्री. दत्ता मुकाडे आणि इतर सर्व कर्मचारी यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अंशुल लोहकरे यांनी केले. विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग लाभला आणि सभागृह देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले.