Monday, November 3, 2025

वनामकृवित अंतरमहाविद्यालयीन कबड्डी व बास्केटबॉल स्पर्धांना उत्साहपूर्ण प्रतिसाद — विद्यार्थ्यांमध्ये वाढता क्रीडाभाव

 क्रीडा स्पर्धांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे सातत्याने प्रोत्साहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरमहाविद्यालयीन कबड्डी आणि बास्केटबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे उपस्थित होत्या. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे, क्रीडा शिक्षक प्रा. संघर्ष शृंगारे आणि क्रीडा कार्यालयाचे श्री. नाटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात डॉ. राहुल रामटेके यांनी खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, खेळ हा केवळ शारीरिक हालचालीसाठी नसून आत्मिक समाधान देणारा घटक आहे. खेळातून संघभावना, संयम व जिद्द शिकायला मिळते. त्यांनी खेळाडूंना संदेश दिला की, खेळामध्ये विजय आणि पराजय ही नैसर्गिक गोष्ट आहे. विजेत्यांनी नम्रता राखावी आणि पराजितांनी चुका सुधारून पुढील वर्षी यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच नांदेड येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या व सर्वांना “जिंकण्यासाठी नव्हे, तर समाधानासाठी खेळा,” असा प्रेरणादायी संदेश दिला.

प्रमुख पाहुण्या श्रीमती गीता साखरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ असून, या खेळामुळेच माझे व्यक्तिमत्त्व घडले. मी विद्यापीठासाठी उत्कृष्ट कबड्डीपटू तयार करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी आपल्या भाषणात आरोग्य आणि मानसिक ताजेपणासाठी खेळाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने एखादा तरी खेळाचा छंद जोपासावा, असे आवाहन केले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी विद्यापीठातील खेळांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे असे मनोगतात सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, या स्पर्धेत १० महाविद्यालयांच्या कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला. विद्यापीठात अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या प्रोत्साहनामुळे सातत्याने होत आहे. त्यांनी कबड्डी आणि बास्केटबॉल या खेळांचा इतिहास सांगत विद्यार्थ्यांना संघभावना, शिस्त आणि सुदृढ आरोग्य राखण्यासाठी खेळ जोपासण्याचे आवाहन केले. विद्यापीठात उपलब्ध क्रीडा सुविधांचा पुरेपूर वापर करून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केलेसूत्रसंचालन डॉ. अश्विनी गावंडे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मधुकर मोरे यांनी मानले.