‘वंदे मातरम्’ गीतातील देशभक्तीचा संदेश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रभावीपणे उलगडला
‘वंदे मातरम्’ या
राष्ट्रीय गीताला यावर्षी दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत.
या ऐतिहासिक घटनेनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सर्व
महाविद्यालयांमध्ये “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला.
या निमित्ताने
परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थी कल्याण अधिकारी
कार्यालयाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि हे अध्यक्ष म्हणून ऑनलाईन उपस्थित होते. प्रमुख अतिथी सहयोगी अधिष्ठाता डॉ.
प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ. राजेश कदम हे होते. व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. एम जी जाधव, जिमखाना
उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शिक्षण प्रभारी डॉ रणजित चव्हाण, कार्यक्रम अधिकारी
डॉ मेघा जगताप, डॉ धीरज पाथ्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व
मान्यवरांनी उत्साहपूर्वक उभे राहून सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम्’ हे गीत
स्वरबद्धपणे गायले. यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘वंदे
मातरम्’ गीताच्या रचनेमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी,
लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे राष्ट्रभावनेने ओतप्रोत
लेखनकार्य, तसेच या गीतातील प्रत्येक शब्दामागील भावार्थ आणि
देशभक्तीचा संदेश अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केल्या.
यावेळी सहयोगी
अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की,
ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने कष्ट, परिश्रम
आणि प्रामाणिक प्रयत्न करणे हे देखील देशसेवेचेच एक श्रेष्ठ रूप आहे. विद्यार्थी,
शिक्षक आणि संशोधकांनी आपल्या कार्यातून समाज आणि शेतकरी यांच्या
प्रगतीस हातभार लावणे हेच खरे राष्ट्रभक्तीचे दर्शन आहे, असे
त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक
करताना विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आपल्या प्रभावी भाषणात
सांगितले की, ‘वंदे मातरम्’ हे गीत
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ठरले असून त्यातून
देशप्रेम, त्याग, आणि मातृभूमीबद्दलची
स्फूर्ती आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात चेतवते. त्यांनी पुढे म्हटले की, या गीतातील प्रत्येक ओळ ही केवळ शब्द नसून ती मातृभूमीविषयीच्या अटळ
निष्ठेचे प्रतीक आहे.
विद्यापीठाच्या
सर्व महाविद्यालयांमध्ये या निमित्ताने विविध सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले. निबंध लेखन, वक्तृत्व, वादविवाद, पोस्टर सादरीकरण, चित्रकला,
लघुचित्र/रील निर्मिती, लोगो डिझाईन आणि
गीतगायन अशा विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सर्जनशीलता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव वृद्धिंगत झाला.
या सर्व
उपक्रमांमध्ये विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, राष्ट्रीय
विद्यार्थी सेना (NCC) कॅडेट्स तसेच इतर विद्यार्थी यांनी
सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या सहभागामुळे विद्यापीठ परिसरात एकता, देशप्रेम आणि सामूहिकतेचा सशक्त संदेश पोहोचला व भारतीय संस्कृतीबद्दल
अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.
या महोत्सवाने
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा गौरव,
देशभक्तीची प्रेरणा आणि मातृभूमीप्रती समर्पणाचा संदेश नव्या जोमाने
अधोरेखित केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमुखाने “भारत माता की जय” असा
जयघोष करून सभागृह दुमदुमविले.
कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. धीरज पाथ्रीकर व डॉ. मेघा जगताप यांनी करून संचलन केले तर आभार डॉ. अनुराधा लाड
यांनी मानले.

.jpeg)
.jpeg)

