वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय
शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तथा शेकरू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित “सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिका”
अंतर्गत “रब्बी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावर
दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम
विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
प्रेरणेतून आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या
कार्यक्रमासाठी सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी
पुढाकार घेतला. कार्यक्रमात मृदशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रमुख मार्गदर्शक डॉ.
हरिहर कौसडीकर तसेच डॉ. पपीता गौरखेडे यांचा सहभाग होता.
मुख्य
मार्गदर्शक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी आपल्या सविस्तर व्याख्यानात रब्बी पिकांतील
मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म
अन्नद्रव्यांची आवश्यकता व त्यांचे संतुलन कसे राखावे याबाबत सखोल मार्गदर्शन
केले. त्यांनी जैविक खतांचा, विद्राव्य खतांचा तसेच सेंद्रीय
घटकांचा योग्य व प्रमाणित वापर कसा करावा हे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की —
जसे मानवासाठी अन्न हेच औषध आहे, तसेच माती हेच खते आहे. त्यामुळे
मातीचे संवर्धन, संरक्षण व सुपीकता टिकवून ठेवणे अत्यावश्यक
आहे. जमिनीत पुरेशी हवा (२५%) आणि पाणी (२५%) उपलब्ध असणे पिकांच्या अन्नद्रव्य
शोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की मोजून-तोलून पाणी
द्यावे, शेतीत जैविक आच्छादन ठेवावे व ते कुजण्यासाठी जैविक
घटकांचा वापर करावा. सेंद्रीय पदार्थांचा नियमित वापर, भूसुधारकांचा
समावेश आणि मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे रब्बी हंगामातील
यशस्वी उत्पादनाचे मुख्य घटक आहेत, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. पपीता गौरखेडे यांनी सेंद्रीय व नैसर्गिक शेतीच्या वाढत्या
महत्वावर प्रकाश टाकत केले. तसेच त्यांनी सुत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन करून
कार्यक्रम सुरळीत पार पाडला.
या
कार्यक्रमाला शेतकरी बांधव व भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे थेट
प्रक्षेपण झूम मीटिंग, युट्यूब चॅनल व फेसबुक
या सामाजिक माध्यमांद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात
शेतकऱ्यांच्या विविध शंका निरसन करण्यात आले.
संपूर्ण
कार्यक्रम अत्यंत उपयुक्त, माहितीपूर्ण व
प्रेरणादायी ठरला. सेंद्रीय व नैसर्गिक शेतीत अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व
स्पष्ट करणारा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या टिकाऊ शेतीकडे वाटचालीस नवी दिशा देणारा
ठरला.

.jpeg)