Friday, November 7, 2025

वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” साजरा

 


भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणादायी ठरलेल्या “वंदे मातरम्” या अमर देशगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव (ता. औंढा, जि. हिंगोली):

येथील कृषि महाविद्यालयात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे उत्साहपूर्ण “वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “वंदे मातरम्” या गीतातील राष्ट्रप्रेम, त्याग आणि मातृभूमीविषयीची ओढ यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. के. वाघमारे यांनी उपस्थिती लावली.

अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी म्हटले की, “वंदे मातरम्” हे केवळ गीत नसून भारतीयांच्या राष्ट्रभावनेचा स्पंदनशील श्वास आहे. या गीताने स्वातंत्र्य सेनानींना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी या गीतातून देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांची शिकवण घ्यावी, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, अशा स्मरणदिनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते व सामूहिक जबाबदारीची जाणीव वाढते.

प्रमुख पाहुणे डॉ. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “वंदे मातरम्” हे गीत प्रत्येक भारतीयाच्या अंत:करणातील देशप्रेमाची शपथ आहे. तरुणाईने या गीतातील मातृभूमीप्रेमाचा संदेश मनात कोरून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी या गीताचा निर्माणकाल, त्याचा ऐतिहासिक प्रवास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत याने निभावलेली प्रेरणादायी भूमिका यावरही प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल भालेराव यांनी करताना वंदे मातरम् गीताच्या रचनेमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात या गीताने चेतवलेली जाज्वल्य देशभक्ती यांचा प्रभावी आढावा घेतला.

 

कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनींनी वंदे मातरम्’ या गीताचे सुरेल सादरीकरण करून सभागृहात देशभक्तीचा स्फूर्तिदायी वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी पुनम पुरी हिने प्रभावीपणे केले, तर गोविंद चव्हाण या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करून सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी महाविद्यालयातील श्री. पवार, श्री. ताटिकोंडलवार, श्री. आडे, श्री. शेख, श्री. खटिंग, श्रीमती बरकुले, तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.