शेतीतील नवे आव्हान ‘न्यू नॉर्मल’ म्हणून स्वीकारून उपाययोजना करणे काळाची गरज — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
सिरसाळा ( ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) तर्फे आयोजित “शेतकरी संवाद मेळावा” हा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान हे होते. व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. मयंक गांधी, बारामती येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, पुणे येथील आटारीचे मुख्य शास्त्रज्ञ मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद , तसेच ग्लोबल विकास ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात माननीय केंद्रीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांशी
थेट संवाद साधून कृषिविषयक धोरणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसंबंधी केंद्र
सरकारच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांच्या स्थापनेत हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी
मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची भूमिका विशद करून विद्यापीठांचा इतिहास आणि
त्यांच्या कार्याचा आढावा मांडला. पुढे ते
म्हणाले की, शेती उद्योगातील महाराष्ट्राचे योगदान राष्ट्रीय पातळीवर सर्वात
अग्रस्थानी आहे. सध्या राज्यात, विशेषतः मराठवाडा प्रदेशात
अतिवृष्टीचे संकट उद्भवले असून, या प्रकारचे संकट आता सतत
जाणवत आहे. हे ‘न्यू नॉर्मल’ म्हणजेच ‘नवीन सामान्य’ स्वरूपात उदयास येत असल्याने
त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी
नमूद केले. माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ग्लोबल विकास ट्रस्टच्या
समन्वयाने मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहे.
यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) उपयोग
करून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. याशिवाय विद्यापीठ
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत आहे. यामध्ये ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा अभिनव उपक्रम विशेषत्वाने उल्लेखनीय
आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी कुलगुरूंसह सर्व शास्त्रज्ञ
थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधतात. तसेच, शेतकरी–शास्त्रज्ञ यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी विद्यापीठाने ‘ऑनलाइन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद’ हा उपक्रम सुरू केला आहे. हा संवाद दर
आठवड्याला दोन दिवस — मंगळवार आणि शुक्रवार — सायंकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजित
केला जातो. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न थेट सोडविण्यावर विद्यापीठाचा भर
आहे. माननीय कुलगुरूंनी सांगितले की, विद्यापीठ सध्या २५०
हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांशी (FPOs) जोडले गेले आहे
आणि शासकीय तसेच अशासकीय संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण
विकासासाठी कार्यरत आहे.
या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कृषि प्रदर्शनात विद्यापीठाने
विविध तंत्रज्ञान दालने उभारून आपली संशोधनपर तंत्रज्ञान प्रगती प्रभावीपणे
प्रदर्शित केली. या माध्यमातून विद्यापीठाचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमास विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ संजीव बंटेवाड (अंबाजोगाई),
डॉ दिनेश चव्हाण (जीरेवाडी), कृषि
अभियांत्रिकी आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल
रामटेके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे,
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विद्यापीठ उपअभियंता डॉ. डी. डी. टेकाळे, तसेच
शास्त्रज्ञ डॉ. गजानन गडदे आणि डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी उपस्थित राहून सहभाग
नोंदविला.
या
मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी कृषि तंत्रज्ञान, हवामान-आधारित शेती, जलसंधारण, सेंद्रिय शेती, तसेच
बाजारपेठेतील नवीन संधी यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण
विकासासाठी विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा हा
मेळावा ठरला आहे.
या कार्यक्रमास हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कृषि तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

.jpeg)
.jpeg)





.jpeg)

.jpeg)


