वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा पाया घडविण्यात मोलाचा वाटा
उचलणाऱ्या विद्यापीठातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित शैक्षणिक मान्यवरांच्या निधनाने
विद्यापीठ परिवार शोकाकुल झाला आहे.
माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता स्वर्गीय डॉ. मारुती व्यंकटराव ढोबळे, कृषि अर्थशास्त्र
विभागाचे माजी विभागप्रमुख स्वर्गीय डॉ. तुकाराम गंगाराम सातपुते, कृषि विस्तार शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख स्वर्गीय डॉ. केशव
रामराव नादरे, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्राध्यापक
संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉ. कामाजी माणिकराव डाखोरे आणि कृषि
वनस्पतीशास्त्र विभागातील सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक स्वर्गीय डॉ. रघुनाथ
हरिश्चंद्र भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या देहावसानामुळे विद्यापीठात शोककळा
पसरली आहे. या सर्व मान्यवर शास्त्रज्ञांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यापीठाची
जडणघडण, संशोधनवृद्धी, शैक्षणिक
गुणवत्ता उंचावणे आणि विद्यार्थीघडणीसाठी अर्पण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यापीठाने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले तसेच विद्यार्थ्यांना
उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. दिवंगत शास्त्रज्ञांचे कर्तृत्व
विद्यापीठाच्या इतिहासात आजही उज्ज्वल अक्षरांनी नोंदलेले आहे.
या दिवंगत मान्यवरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठ परिवारातर्फे
श्रद्धांजली आणि शोकसभा दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता
डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विविध
विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी
तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
शोकसभेत दिवंगत शास्त्रज्ञांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अमूल्य
योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यापीठ पुढील
काळात अधिक दृढपणे प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल, अशी भावना यावेळी
व्यक्त करण्यात आली.
.png)