Wednesday, November 12, 2025

वनामकृविचा मराठवाड्यात "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" उपक्रम यशस्वी

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू असून, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये आणि विस्तार केंद्रांतील शास्त्रज्ञांचे समूह आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवतात. या दिवशी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शन कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यावेळी विद्यापीठाच्या ११ चमूतील ४२ शास्त्रज्ञांसह कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाद्वारे सुमारे ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथील शास्त्रज्ञांनी या उपक्रमाअंतर्गत मौजे पिंपळगाव कुटे, ता. वसमत, जि. हिंगोली येथे रब्बीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या वर्षीच्या सततच्या पावसामुळे हरभरा पिकावर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विस्तार विषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले, तर उपस्थित शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी हरभरा व गहू लागवड तंत्रज्ञानासह ऊसाच्या सुपरकेन तंत्राविषयी सविस्तर माहिती दिली. कृषि विभागाचे उप कृषि अधिकारी श्री. गजानन वरुडकर यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच श्री. राजकुमार कुटे, चांदोबा कदम, अनंतराव कुटे (पोलीस पाटील), कृषि विभागाचे श्री. राजेश शेळके व श्री. प्रल्हाद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मराठवाड्यातील इतर ठिकाणी सहभागी शेतकऱ्यांना शास्त्रज्ञानी कापसाच्या वेचणी, कापसाच्या विविध वाणांची गुणवत्ता, तसेच रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना फळबाग, ऊस पिकाचे व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, पेरणी व खत व्यवस्थापन, पशुधनाची काळजी, बाजार व्यवस्थापन याबाबतही माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प व सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, लातूर येथील कृषि महाविद्यालय, तसेच  राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र (छत्रपती संभाजीनगर), नांदेड येथील केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) याबरोबरच कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, बदनापूर) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे,  डॉ सुर्यकांत पवार, डॉ. आनंद गोरे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. मदन पेंडके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. हनुमान गरुड, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.किशोर शेरे, डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. नरेंद्र जोशी, कृषि विभागातील श्री. सुभाष साळवे व इतर अधिकारी, याच्यासह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. सतीश बेंद्रे, श्री व्यंकट ठके, श्री प्रमोद कळसकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व मार्गदर्शन केले.