Saturday, June 10, 2023

वनामकृविच्‍या लातूर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट’ केंद्राचा पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प (सूर्यफुल) या योजनेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये सूर्यफुल पिकांवर केलेल्या उत्कृष्ट संशोधन कार्याबदल मंडौर, जोधपूर (राजस्थान) येथील कृषि विद्यापीठ पार पडलेल्या वार्षिक समूह बैठकीमध्ये उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यांत आला. सदर पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उप-महासंचालक डॉ. टी.आर. शर्मा, सहाय्यक महा-संचालक डॉ. संजीव गुप्ता, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ. बा.आर. चौधरी यांचे हस्ते प्रदान करण्यांत आला. सदरील गळीतधान्यें संशोधन केंद्राव्दारे आजपर्यंत सूर्यफुलाचे ४ संकरीत वाण व २ सुधारीत वाण विकसित केले असुन ४५ पेक्षा अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतक-यांसाठी प्रसारित करण्यांत आलेल्या आहेत. या वाणांची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल इत्‍यादी राज्यात लागवड करण्यांत येते. 

केंद्रास मिळालेल्‍या पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, तेलबिया उत्‍पादनात देश व राज्‍य आत्‍मनिर्भर बनविण्‍याकरिता राज्‍यातील गळीतधान्‍य पिकांखालील क्षेत्रावाढी करिता प्रयत्‍न करावा लागेल, याकरिता संशोधन केंद्राने विकसित केलेले विविध गळीतधान्‍येचे वाण उपयुक्‍त ठरणार असल्‍याचे सांगुन संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

संशोधन कार्यासाठी शास्त्रज्ञांना कुलगुरु डॉ. इन्‍द्र मणि, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर.के. माथुर व प्रमुख (पीक सुधारणा) डॉ. एम. सुजाता यांचे मौलीक मार्गदर्शन लाभले.  पुरस्कार मिळाल्याबदल केंद्राचे माजी गळीतधान्यें विशेषज्ञ डॉ. महारुद्र घोडके, गळीतधान्यें विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार डॉ. शिवशंकर पोले, कृषि विद्यावेत्ता प्रा. अशोक घोटमुकळे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्रा. संतोष वाघमारे, किटकशास्त्रज्ञ प्रा. कल्याण दहिफळे, सहाय्यक पैदासकार डॉ. ज्ञानेश्‍वर देशपांडे आदीसह केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यांत येत आहे.

Wednesday, June 7, 2023

आयआयटी खरगपुर येथे आयोजित तंत्रज्ञान व्हिजन २०४७ कार्यशाळेत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे मार्गदर्शन

देशातील अग्रगण्‍य संस्‍था खरगपूर येथील आयआयटी संस्‍था आणि तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषद यांच्‍या  वतीने तंत्रज्ञान व्हिजन २०४७  आणि हवामान बदल या विषयावर १ ते २ जून या कालावधीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर खरगपूर आयआयटीचे संचालक प्रा. व्ही के तिवारी, परिषदेचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गौतम गोस्वामी, आयोजक आयआयटीचे प्रा. जी. पी. राजा शेखर, हेल्थकेअर सेंटर ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष प्रा. गौतम साहा, आयआयटी खरगपूर येथील भूविज्ञान आणि भूभौतिकशास्त्राचे प्रा.अभिजित मुखर्जी आदींची उपस्थिती होती.

या दोन दिवसीय तांत्रिक सत्रात देशातील अग्रगण्‍य संशोधक विचारमंथन करून आत्‍मनिर्भर विकसित भारत करिता हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान निर्मिती यावर तंत्रज्ञान व्हिजन २०४७ मसुदा तयार करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट हे देशाला तंत्रज्ञान विकासात जगात नेतृत्‍व करण्‍याच्‍या दृष्‍टीने मूलभूत आणि उपयोजित भविष्यातील संशोधन क्षेत्रे ओळखणे असुन २०४७ पुढील तंत्रज्ञान निर्मितीबाबत नियोजन करणे, काटेकोर कृषी आणि अन्न पोषण सुरक्षा, ऊर्जा आणि पर्यावरण, किफायतीशीर आरोग्य सेवा, अत्‍याधुनिक साहित्य आणि वाहतूक आदी विषयावर कार्यशाळेत चर्चा करण्‍यात येऊन तंत्रज्ञान विकासाचा मसुदा करण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, हवामान बदलाचा शेतीवर विपरित परिणाम होत असुन अन्‍न पोषण सुरक्षे करिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. बदलत्‍या हवामानात अनुकूल पिकांची वाण निर्मिती व तंत्रज्ञान निर्मितीत देशातील विद्यापीठ संशोधनात भर देत आहे.  ग्रीन ऊर्जा व पर्यावरण संतुलन याकरिता किफायतीशीर तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे असल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यशाळेत देशातील विविध संस्‍थेतील संशोधक सहभागी झाले होते.

Tuesday, June 6, 2023

शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर आवश्यक….. कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या कौशल्य विकास – कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ 

औरंगाबाद : शेतीच्या विकासासाठी यांत्रिकीकरणाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक असून शेतक-यांमध्ये कौशल्य विकास करणे आवश्यक असल्याचे मत कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सी.एन.एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ मे रोजी आयोजित “कौशल्य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

यावेळी ऑनलाइन माध्यमाव्दारे अटारी पुणेचे संचालक डॉ. एस.के. रॉय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, सीएसआर, सीएनएच नवी दिल्लीच्या प्रमुख कविता साह, सीएसआर, सीएनएचचे पश्चिम प्रक्षेत्र प्रमुख नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, डॉ. उदय खोडके, डॉ. सुर्यकांत पवार, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. किशोर झाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि सी.एन.एच.  इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), नवी दिल्ली यांच्यात करार होऊन “उन्नत कौशल्य – कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” कार्यक्रम मराठवाडा विभागात राबवला जाणार आहे. ज्यामध्ये विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद, खामगाव, बदनापूर, तुळजापूर यांच्यामार्फत एक वर्षामध्ये प्रत्येकी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ज्याव्दारे दिड हजार पेक्षा जास्‍त शेतक-यांना कृषी यांत्रिकीकरणावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यावेळी अटारी पुणेचे संचालक डॉ. एस.के. रॉय यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. देवसरकर, श्री देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. श्रीमती साह यांनी सी.एन.एच. इंडस्ट्रीय इंडिया (न्यु हॉलंड) मार्फत करण्यात आलेल्या विविध कार्य व उपक्रमांची माहिती दिली. श्री. सावंत यांनीही कंपनीच्या विविध उपक्रमाच्या माहितीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर झाडे यांनी केले.




प्रत्येक दिवस असू द्या तंबाखू विरोधी दिवस …….. प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ३१ मे रोजी “तंबाखू निषेध दिन” साजरा करण्‍यात आला. कान नाक घसा तज्ञ डॉ. तेजस तांबुळे मुख्‍य व्‍याख्‍याते म्‍हणुन उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात डॉ. तेजस तांबुळे म्‍हणाले की, सद्याच्या काळात मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेट, गुटखा, विडी, तंबाखू अशा अनेक प्रकारात हे विष आपल्या शरीरात विरघळत आहेत. यामुळे कळतं किंवा नकळत लोक स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत. तंबाखूपासून होणार्‍या हानीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा अत्यंत व्यसनाधीन पदार्थ असतो. निकोटीनमुळे हृदय, फुफ्फुस आणि पोट तसेच तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. व्यक्तीचे शरीर शारीरिक आणि भावनिक पातळीवर निकोटीनचे आहारी जाते. व्यक्तीला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.  तंबाखूच्या धुरा मध्ये ७००० केमिकल्स असतात ज्यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील इतर व्‍यक्‍तीवरही याचा परिणाम होतो.

अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले कि, जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या माध्यमातून लोकांना तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरूक केले पाहिजे. हा सार्वजनिक आरोग्यावर तंबाखूच्या वापराच्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वैयक्तिक तंबाखू अवलंबित्व कमी करण्यासाठी समर्पित कार्यक्रम आहे. तंबाखूमुळे होणारी हानी पाहता सर्व देशांची सरकारे तंबाखूजन्य पदार्थांवर कडक नियम लागू करत आहेत. जागतिक तंबाखू निषेध दिन २०२३ ची थीम "आम्हाला अन्न हवे, तंबाखू नव्हे" अशी आहे. आरोग्य जोपासने अत्यंत गरजेचे असल्‍याचे सांगुन प्रत्येक दिवस तंबाखू विरोधी दिवस असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी चित्रप्रदर्शनीही लावण्‍यात आली होती. कार्यक्रमात साक्षी क्षीरसागर, पलक इंदुरकर, ऋषी सातोनकर, अंशिका राऊत, समर्थ असुतकर , अजय मुंढे, दीपक लाटे, विश्वास चोथवे, दीपक झगरे, साहिल मोटे, उदय पाटील, साक्षी दवणे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायत्री वाणी तर आभार जानव्ही चव्हाण हीने मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता डॉ.राहुल रामटेके, डॉ.विवेकानंद भोसले, प्रा.भास्कर भुइभार, डॉ.पंडित मुंढे, डॉ.सुमंत जाधव, डॉ.सुभाष विखे, डॉ.मधुकर मोरे, प्रा.दत्तात्रय पाटील, डॉ.शाम गरुड, डॉ.विशाल इंगळे, डॉ. प्रमोदिनी मोरे व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे यांनी प्रयत्न केले. 






Monday, June 5, 2023

मौजे आडगाव येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यक्रम

वनामकृवितील कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती योजने अंतर्गत राबविण्‍यात आला उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती अंतर्गत परभणी तालुक्यातील मौजे आडगाव येथे दिनांक जुन रोजी “खरीप हंगाम पूर्व नियोजन” या विषयावर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यापीठातील तज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. किशोर कुगने हे होते तर सरपंच श्री. बाळासाहेब ढोले, उपसरपंच रमाकांत पाऊडशेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.   

अध्यक्षीय भाषणात डॉ. किशोर कुगने यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती या योजनेचा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला.  

मार्गदर्शनात वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. जी. आर. हनवते म्‍हणाले की, रासायनिक खतांचा वापर योग्य वेळी व योग्य जागेत टाकून करावा जेणेकरुन अतिरिक्त खताची मात्रा दिली जाणार नाही. तसेच तणांची वाढ, जमिनीचा सामू वाढणे अशा एक व अनेक जमिनीवर होणारे अनिष्ठ परिणाम होण्यास टाळले जाऊ शकते. शेतात एकात्मिक अन्नद्रव्ये पध्दतीचा वापर करण्यावर भर देण्‍याचा त्‍यांनी सल्‍ला दिला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. ए. के. गोरे यांनी पूर्व मशागत करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, जमिनीच्या उताराला आडवी मशागत करावी जेणेकरुन पावसाच्या पाण्यामध्ये होणारी जमिनीची धूप थांबवली जाईल. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी तसेच बियाण्याला बीजप्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. तसेच कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी पिकात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांचा कमी प्रमाणात वापर, माती परिक्षणानुसार खतांचा वापर करणे व सेंद्रीय खत जसे गांडूळ खत, हिरवळीच्या खतांचा व कंपोस्ट खतांचा वापर यावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे हे होते, सुत्रसंचलन श्री एम. डब्ल्यू. राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एम. डब्ल्यू. राठोड, मोतीराम ब्याळे, मल्लिकार्जून ब्याळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मौजे आडगाव या गावातील शेतकरी मंडळी उपस्थित होते.

वनामकृवित जागतिक पर्यावरण दिन साजरा

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजन करण्‍यात आले होते. व्यासपीठावर परभणी विभागीय वन अधिकारी श्री. अरविंद जोशी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, रेंज वन अधिकारी ऋषिकेश चव्हाण, रेंज वन अधिकारी प्रकाश शिंदे, नांदेड केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगूरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधीत करतांना म्‍हणाले की, पर्यावरणाच्या निरंतर संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून पाळला पाहिजे. येणा-या हंगामात परभणी कृषि विद्यापीठ परिसरातील रेल्‍वे लाईन भोवताल मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणार असुन संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर वृक्ष लावगड मोहिम राबविण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ. गोखले म्‍हणाले की, झपाट्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर विपरित परिणाम होत असून कृषी संशोधनाच्‍या आधारे बदलत्‍या हवामानात अनुकूल पिकांचे वाण व कृषि तंत्रज्ञान विकसित करण्‍यात कृषी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. अमर्याद प्लास्टिकच्या वापरामुळे मानवाबरोबर इतर घटकांवरही परिणाम होत असून प्लास्टिकच्या वापरावर व उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज आहे. परभणी कृषी विद्यापीठात वेळोवेळी वृक्ष लागवड, स्‍वच्‍छता मोहिम, पर्यावरणाबाबत प्रबोधन कार्यक्रम राबविण्‍यात येतात.

विभागिय वन अधिकारी अरविंद जोशी यांनी वन विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, वन विभागाच्या वतीने पुरेशा प्रमाणात मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल असे सांगितले.तर प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनी प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे निसर्गाची मोठी हानी होत असून प्रत्येकांनी प्लास्टिकचा वापर करने टाळल्यास पर्यावरणाची जोपासना होण्यास मदत होईल असे सांगितले.

प्रास्‍ताविकात क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या कार्याची माहिती देऊन मिशन लाईफ आणि प्लास्टिक वापरापासून होणा-या गंभीर परिणामाची माहिती दिली. निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा अवलंब करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रणचित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. रवि शिंदे यांनी मानले.

जागतिक पर्यावरण दिनाच्‍या पुर्वसंध्‍येला कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. तसेच विद्यार्थ्‍यांकरिता तृणधान्य व पर्यावरण या विषयावर पोस्‍टर आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्‍यात आले, यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच राष्‍टीय सेवा योजना आणि राष्‍ट्रीय छात्रसेनाच्‍या स्‍वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात स्वच्छता मोहिम राबवली तर केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड द्वारे पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोस्‍टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.





Friday, June 2, 2023

बीबीएफ पध्‍दतीने पिकांच्‍या लागवडीमुळे उत्पादन वाढ होते ....... डॉ. गजानन गडदे

मौजे धार येथे खरीप पुर्व शेतकरी बैठक संपन्‍न 

रिलायन्स फाउंडेशन, परभणी आत्‍मा आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ३१ मे रोजी मौजे धार (ता. जि. परभणी) येथे खरीप पूर्व शेतकरी बैठक घेण्यात आली. बैठकीत कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि परभणी आत्माच्‍या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती. स्वाती घोडके यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. गडदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीने करणे गरजेचे आहे, या पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमाने होते, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत एकरी बियाणे कमी लागते. मूलस्थानी जलसंवर्धन होते तर अधिक पाऊसात सरीतुन पाण्‍याचा निचरा होतो. पिकांच्‍या उत्पादनात २० - २५ टक्के वाढ होते. डॉ गडदे यांनी सोयाबीनची बीजप्रक्रिया, खत  व तण व्यवस्थापन, शंखी गोगलगाय व्यवस्थापन आदी  विषयावर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या कृषि विषयक शंकेचे निरासरण केले. श्रीमती स्वाती घोडके यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगुन माती नमुने घेण्याची पद्धत, सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्‍याची पध्‍दत याविषयी मार्गदर्शन केले. बैठकीस गावातील आत्मा अंतर्गत गटातील शेतकरी तसेच इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता रिलायन्स फाउंडेशनचे श्री.रामा राऊत आणि विद्यापीठाचे श्री नितीन मोहिते यांनी परिश्रम घेतले.