अपरिपुर्णता हाच निसर्गाचा नियम आहे, जगात कोणीही परिपुर्ण नाही. अपरिपुर्णते कडुन परिपुर्णतेकडे वाटचाल हेच जीवन आहे. आयुष्य हे संघर्षमय आहे, संघर्षाशी सामना करण्यासाठी सदैव तयार रहा, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मा श्री निसार तांबोळी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि लोकशाही पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन दिनांक ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर मुख्य मार्गदर्शक नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक मा श्री निसार तांबोळी व परभणी शहर महानगरपालिका आयुक्त मा श्री देविदास पवार हे होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, जिमखाना उपाध्यक्ष डॉ संजीव बंटेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री निसार तांबोळी म्हणाले की, आपल्या आवडीचे करिअर निवडा, करिअर निवडण्याची संधी आताच आहे. एकदा निवडलेल्या करिअर पुन्हा बदल करणे अवघड आहे. चुकीचे करिअर निवडल्यास पुर्ण पुढील आयुष्य तणावात जीवन व्यथीत करावे लागेल. आवडीच्या करिअर मध्ये आनंदी व समाधानी राहताल. महाविद्यालयीतील जीवन हे आयुष्यातील सर्वांत आंनदात काळ असतो, नंतर अनेक जबाबदा-या व कर्तव्य आपल्यावर येतात. करिअरमधील अपयशाकरिता तयार रहा, जो हारण्यास घाबरत नाही, तोच यशस्वी होतो. मराठवाडयातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण यांची कमतरता असुन संवाद कौशल्यात कमी पडतो. व्यक्तीमत्व विकासावर भर दया. चांगल्या गोष्टी शिका, प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. जीवनात शिस्तीस प्राधान्य दया, वेळेचे महत्व ओळखा, कठोर मेहनत करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मा श्री देविदास पवार यांनी म्हणाले
की, ध्येय निश्चित करून योग्य नियोजन
करा. जिद्द व कठोर मेहनत करण्याची तयारी हेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. परभणी
कृषी विद्यापीठाने अनेक चांगले अधिकारी व प्रशासक राज्यास व देशास दिले आहेत. विद्यापीठातील
ग्रंथालय अत्यंत अदयायावत असुन याचा लाभ घ्या असे सांगुन त्यांनी स्थानिक स्वराज्य
संस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, परभणी विद्यापीठातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. जो व्यक्ती अपयशाचा सामाना करू शकतो, तोच जीवनात यशस्वी होतो. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयाचा मोठा वाट असतो, महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त मेहनत घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात लोकशाही पंधरवडा निमित्त महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, यात रांगोळी स्पर्धेतील दुर्गा घांडगे (प्रथम), नेहा भालेराव (व्दितीय), भारती जावळेकर (तृतीय) तर वादविवाद स्पर्धेत खुशी सातोनकर (प्रथम), क्रांती वाटोडे (व्दितीय), शिवम बागल (तृतीय) तसेच निबंध स्पर्धेत क्रांती वाटोडे(प्रथम), श्वेता प्रिया (व्दितीय), विजया पवार (तृतीय) व काव्यवाचन स्पर्धेत योगेश इंगळे (प्रथम), अश्विनी वाकुडे (व्दितीय), क्रांती वाटोडे (तृतीय) यांनी पुरस्कार प्रदान करण्यात आले. मा श्री निसार तांबोळी हे परभणी कृषि महाविद्यालयाचे १९८८ बॅचेचे तर मा श्री देविदास पवार हे १९८६ बॅचेचे विद्यार्थी असुन आपल्या कठोर परिश्रमातुन स्पर्धे परिक्षेत यश संपादन केले आहे, त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना आपल्या संवादातुन उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले तर पाहुणाचा अल्प परिचय डॉ पी आर झंवर यांनी दिला. सुत्रसंचालन डॉ रणचित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठ प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल व विभाग प्रमुख डॉ व्ही बी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ जयश्री एकाळे, डॉ एस आर जक्कावाड, डॉ एम आय खळगे, डॉ एन एस कांबळे, डॉ अनुराधा लाड, डॉ अनंत लाड आदींनी परिश्रम घेतले.