वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बीज तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभाग
आणि मऊ (मध्य प्रदेश) येथील भारतीय बीज विज्ञान संस्था
यांच्या सयुक्त विद्यमाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी आदिवासी उपयोजना अंतर्गत मौजे
तळेगांव (ता उमरी जि नांदेड) येथील आदिवासी
शेतक-यांकरिता बीजोत्पादन प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष श्री संजय
कुलकर्णी, श्री माधवराव जाधव, डॉ एस बी घुगे, डॉ एस पी मेहत्रे, डॉ स्मिता सोळंकी,
सरपंच श्री सुरेश देशमुख, उपसरपंच श्री अयुब खान पठाण आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, विविध माध्यमातुन राज्यातील
वंचित शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कोरडवाहु भागातील शेतकरी बांधवापर्यंत कृषि तंत्रज्ञान पोहचविण्याचा
विद्यापीठ प्रयत्न करित आहे. त्याचाच भाग म्हणुन आदिवासी शेतकरी बांधवांमधील आधुनिक
सिंचन पध्दती वापर वाढीकरिता तुषार सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. शेतीसाठी
लागणा-या आधुनिक निविष्ठांसह मार्गदर्शन केल्यास शेतकरी बांधवाचा तंत्रज्ञानावरील
विश्वास वाढीस लागण्यास मदत होते. विद्यापीठ मराठवाडयातील तसेच राज्यातील इतर
भागातील अनेक आदिवासी गावांमध्ये कृषि तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य करित आहे, यात
मुख्यत: कृषि अवचारे, तुषार सिंचन पध्दती, विद्यापीठ विकसित पिकांचे वाण आदीचा प्रसार
करित असुन अनेक गावातील आदिवासी शेतकरी बांधवाच्या जीवनात आमुलाग्र असा बदल झाला
आहे.
मार्गदर्शनात डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, विद्यापीठ केवळ कृषि निविष्ठांचे वाटप न करता, निविष्ठाचा योग्य वापराकरिता वेळोवेळी मार्गदर्शन विद्यापीठाच्या वतीने केले जाते. आदिवासी शेतकरी बांधवाच्या जीवनात स्थैर्याकरिता कृषि तंत्रज्ञान माध्यमातुन आदिवासी शेतक-यांच्या पिक पध्दतीतील बदल घडुन येत आहे. यावेळी श्री संजय कुलकर्णी व श्री माधवराव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणात जवस लागवडीवर डॉ अमोल मिसाळ यांनी तर करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संचालक बियाणे डॉ के एस बेग यांनी केले. डॉ अमोल मिसाळ यांनी सुत्रसंचालन केले तर आभार डॉ दौंडे यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मौजे तळेगांव आदिवासी बहुल गावांतील सात आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठया मौजे तळेगांव येथील शेतकरी व विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.