वनामकृविच्या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २१ फेबुवारी रोजी गुजरात मधील नवसारी कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधनाचे निष्कर्ष या विषयावर नैसर्गिक साधन सामग्री व सेंद्रीय शेती विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद कसवाला यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी वनामकृवितील मृदा विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, मौजे आमशेत (ता. महाड जि. रायगड) येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती वैशाली संतोष सावंत, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रविण वैद्य म्हणाले की, सेंद्रीय शेती ही शाश्वत करण्यासाठी ती नियानबध्द पध्दतीने
करणे गरजेचे असून त्यात सातत्य पाहिजे. सेंद्रीय शेतीत अन्नद्रव्यांचे
व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक विविध स्त्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे. यात गिरिपुष्पाची झाडे बांधावर लावणे, विविध प्रकारच्या कंपोस्टची निर्मिती आणि विशेष म्हणजे
सेंद्रीय शेतीला चार ते पाच जनावरांची जोपासना करुन आधार देण्याची गरज आहे, जेणेकरुन सेंद्रीय
निविष्ठा शेतातच तयार होईल व निविष्ठांवर होणारा खर्च कमी होईल.
प्रमुख
वक्ते डॉ. आनंद कसवाला आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, सेंद्रीय शेती करणे म्हणजे समाजसेवा करण्यासारखेच आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये कीडनाशक व रोगनाशक यांचा अपरिमीत वापर होत आहे.
ज्यामुळे कीटकनाशकांचा फळ व भाजीपाल्यामध्ये अंश आढळुन येत आहे. फळे
पिकवण्यासाठी व आकर्षक रंग आणन्यासाठी रसायनांचा मोठया प्रमाणात वापर होत आहे.
याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. नियोजनबध्द पध्दतीने सेंद्रीय शेतीची टप्याटप्याने सुरुवात
करावी. यात सेंद्रीय शेती प्रक्षेत्र विकसीत करण्यासाठी मुलभुत आवश्यक बाबी जसे
सेंद्रीय प्रक्षेत्र इतर प्रक्षेत्रापासुन वेगळे ठेवण्यासाठी चर किंवा बांध किंवा
जैविक कुंपणाचा वापर करावा, पिकांची
फेरपालट,
आंतरपिक पध्दतीचा वापर, आच्छादनाचा वापर, हिरवळीचे खते, जैविक खते इत्यांदीचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचे आरोग्य
अबाधीत राहिल, खर्च कमी होईल, उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल व पर्यावरणाचा हास होणार नाही. नवसारी कृषि विद्यापीठाने पपई, केळी, हळद
ऊस,
अशा विविध पिकांमध्ये सेंद्रीय लागवड तंत्रज्ञान विशेषकरुन
कमी खर्चाचे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे पॅकेज विकसीत केले आहे व सदरील उत्पादनाचे
बाजारपेठ व्यवस्थापनही केले आहे. शेतकयांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी खर्चात कपात करुन त्याला
भाव जास्त मिळेल असे उत्पादन घ्यावे व विक्रीसाठी गटाच्या माध्यमातून प्रयत्न
करावेत, असा सल्ला त्यांनी दिला.
प्रशिक्षण कार्यक्रमात दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. प्रितम भुतडा यांनी केले आणि डॉ. सुदाम शिराळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. सुनिल जावळे, अभिजीत कदम, दिपक शिंदे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.