Friday, February 25, 2022

सेंद्रीय शेतीत जास्‍तीत जास्‍त जैविक घटकांना वापर करणे गरजेचे ..... कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे

वनामकृवित आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान’’ या विषयावर कृषिविद्यावेत्ता तथा प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते मौजे कोगील (बु) (ता. करवीर जि. कोल्हापूर) येथील प्रगतशील शेतकरी श्री. दिनाथ किनीकर, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील आदींचा प्रमुख सहभाग होतो. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

मार्गदर्शनांत प्रमुख वक्ते डॉ. आनंद गोरे म्हणाले की, सेंद्रीय शेती करतांना जमिनीची मशागत, लागवड, जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक संरक्षण, प्रमाणीकरण आदीं बाबतीत दिर्घकालीन नियोजन आवश्यक असुन या सर्व बाबींची नोंदी दररोज ठेवाव्यात, जेणे करून प्रमाणीकरण करतांना अडजणी येणार नाही. स्थानिक उत्पादने, पीजीएस प्रमाणीकरणा अंतर्गत विक्री करता येतील तर निर्यातीसाठी तृतीयपक्ष सेंद्रीय प्रमाणीकरणाची गरज आहे. सेंद्रीय शेतीत जास्‍तीत जास्‍त जैविक घटकांचा वापर करणे आवश्‍यक असुन सेंद्रीय शेती पशुधनासोबतच जमिनीतील जीवजंतूचे अस्तित्व असणे शेतीच्या परिस्थिकीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पुर्णपणे सेंद्रीय खते, जैविक किटकनाशके व रोगनाशकांचा वापर करुन केलेली शेती म्हणजे सेंद्रीय शेती होय. बीज प्रक्रियेसाठी रायझोबीयम, अॅझॅटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जीवाणू दीचा वापर करावा. अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जैविक खते, हिरवळीची खते, शेतातील पालापाचोळा व सेंद्रीय पदार्थ जमिनीतच गाडल्यास जमिनीचे आरोग्य अबाधित राहून उत्पादनात वाढ होते. मागील किटकनाशकांचा वापर मोठया प्रमाणावर होत असल्यामुळे भाजीपाला व फळपिकांमध्ये किटकनाशकांचे अंश मोठया प्रमाणावर आढळुन येत आहेत, याचा विपरीत परिणाम मानवी व प्राणी जीवनावर होत आहे. या वाढणा­या अवशेषामुळे पंजाब राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे तेथे कॅन्सर ट्रेन सुरु करण्यात आली. भविष्‍यात मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने विषमुक्त अन्न उत्पादित करण्‍यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल असे ते म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीवरील प्रशिक्षण हे आज शेतक­यांसाठी गरजेचे आहे. यामध्ये पीक संरक्षणप्रमाणीकरण या विषयात सोप्या पध्दतीने मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. राज्यातील चारही कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, शेतक­यांना प्रशिक्षण देण्यासाठी तत्पर आहेत. शेतक­यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे वाहन त्यांनी केले. तर प्रगतशील शेतकरी श्री. दिनाथ किनीकर त्यांचे अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये गांडुळ खताचा वापर केल्यास भाजीपाला व फळ पिकांचे चांगले उत्पादन घेता येते. सेंद्रीय शेती आंतर पिक व मिश्र पिक पध्दतीचा अवलंब करावा. अन्नधान्य पिकासोबतच शेतक­यांनी भाजीपाला व फळ पिके सेंद्रीय पध्दतीने पिकवावीत जेणेकरुन चांगला भाव मिळुन आर्थिक नफा होईल. 

प्रशिक्षण कार्यक्रमास दोन हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी सहभाग नोंदविला. प्रमुख वक्ते यांनी शेतक­यांनी विचालेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन व योग्य मार्गदर्शन करुन शेतक­यांच्या शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार श्रीमती सारीका नारळे यांनी मानले आणि श्री. ऋषीकेश औंढेकर यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.