महिनाभर रोज सायंकाळी होणार सेंद्रीय शेतीवर जागर
देशातील व राज्यातील नामांकित तज्ञ करणार मार्गदर्शन
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय ३० दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण राहणार असुन कार्यक्रमास आनंद (गुजरात) येथील आनंद कृषि विद्यापीठ व गुजरात सेंद्रीय कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. बी. कथिरीया आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाराष्ट्र राज्य कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) श्री. दिलीप झेंडे, नागपूर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत, मौजे झरी येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मेघाताई देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण व मा. संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहेत. सदरील प्रशिक्षणात दि. १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान रविवार वगळुन ऑनलाईन झुम मिटिंग प्लॅटफॉर्मवरुन सायंकाळी ७.०० ते ८.३० व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार असुन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनल https://www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. व्याख्यानानंतर तज्ञांची व प्रशिक्षणार्थ्यांची संबंधित विषयावर प्रश्नोत्तरे व चर्चा होईल. यात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, भाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, रेशीम उद्योग, प्रक्रिया उद्योग, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, मधुमक्षीका पालन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर राज्यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था येथील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये नवसारी कृषि विद्यापीठ (गुजरात), आनंद कृषि विद्यापीठ (गुजरात), केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद, भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्था, मोदीपुरम (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय जैविक शेती केंद्र, गाजीयाबाद, प्रादेशिक जैविक शेती केंद्र, नागपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग व इतर स्वयंसेवी व खाजगी संस्थेतील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक ३१ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांचे अध्यक्षतेखाली होणार असून नवसारी (गुजरात) येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. झिनाभाई पटेल, व सेंद्रीय शेती धोरण निश्चितीकरण समितीचे अध्यक्ष तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख, डेहराडुन (उत्तराखंड) येथील भारतीय मृद व जल संधारण संस्थेचे संचालक डॉ. एम. मधु, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नवसारी कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोनल त्रिपाठी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे प्रकल्प संचालक श्री. संतोष आळसे, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सोपानराव अवचार आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सदरिल प्रशिक्षणाचा शेतकरी बंधु भगिनी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांनी सहभाग नोंदवुन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे व सर्व सदस्य शास्त्रज्ञ यांनी केले आहे.