वनामकृविच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणास सुरूवात
महिनाभर रोज सायंकाळी होणार सेंद्रीय शेतीवर जागर
शेतीतील रासायनिक किटकनाशके व खतांच्या अवाजवी वापरामुळे पर्यावरणावर
व मानवी आरोग्यावर अनिष्ठ परिणाम होत आहे, शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळत आहेत, असे
प्रतिपादन आनंद (गुजरात) येथील आनंद कृषि विद्यापीठ व गुजरात सेंद्रीय कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. के. बी. कथिरीया यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण
जयंती महोत्सवाचे औचित्य
साधुन सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ३० दिवसीय
राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा पुणे येथील महाराष्ट्र कृषि तंत्रज्ञ संस्थेचे अध्यक्ष डॉ.
व्यंकटराव मायंदे हे प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे
माजी कुलगुरू मा डॉ आर बी देशमुख, वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, महाराष्ट्र राज्य कृषि आयुक्तालयाचे कृषि संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) श्री. दिलीप झेंडे, नागपूर येथील प्रादेशिक जैविक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत, लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्चात अभियांत्रिकी
तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ नचिकेत कोटवालीवाले, फ्रंकफोर्ट अमेरिका येथुन सामाजिक
कार्यकर्त्या डॉ संगिताताई तोडमल, मौजे झरी येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती मेघाताई देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरु मा. डॉ. के. बी. कथिरीया पूढे म्हणाले की, सेंद्रीय
शेती व नैसर्गिक शेतीची काळाची गरज ओळखुन गुजरात कृषी विद्यापीठात नुकताच पदव्युत्तर
अभ्यासक्रमास सुरूवात करण्यात आला आहे. सेंद्रीय शेतीत विविध पिकांच्या रोग व किड
प्रतिकारक वाणांचा निवड करणे गरजेचे आहे, ही वाणे जैविक किटकनाशकांना प्रतिसाद देणारी
असावी. सेंद्रीय शेतीत
देशी गायीचे महत्व अधिक असुन देशी गायीच्या संगोपणाकरिता गुजरात सरकार अनुदान देते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, केंद्र व राज्य
सरकार नैसर्गिक शेती व सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत असुन गुजरात राज्यात सेंद्रीय
शेतीची चळवळ उल्लेखनीय कार्य होत आहे. भारतातील शेतकरी बांधवाना सेंद्रीय शेती नवीन
नाही. सेंद्रीय शेतीत उपयुक्त जीवाणुला महत्व असुन संशोधनाच्या आधारे निश्चित केलेल्या
सेंद्रीय निविष्ठांची निर्मितीवर भर दयावा लागेल. आज शहरी भागातही परसबागेत रासायनिक मुक्त भाजीपाल
लागवड अनेकजण करीत आहेत, यादृष्टीने त्यांनाही सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात
यावे.
माजी कुलगुरू डॉ. व्यंकटराव मायंदे म्हणाले की, रासायनिक खत व किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे मानव, जनावरे तसेच पर्यावरणावर विपरित परिणाम होत. सेंद्रीय मालास बाजारपेठेत मागणी वाढत आहे परंतु सेंद्रीय शेती शेतकरी बांधवाना कितपत किफायतीशीर आहे, यावर संशोधनाची गरज आहे. सेंद्रीय पिक लागवड तंत्रज्ञानाची एकच शिफारस सर्व भागातील शेतकरी बांधवाना देण्यापेक्षा त्या त्या स्थानिक परिस्थिती व उपलब्ध निविष्ठा याचा विचार व्हावा. शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणा-या कृषि विस्तारकांची फळी निर्माण करावी लागेल. सेंद्रीय शेतमाल प्रमाणीकरणाची प्रक्रिया सोपी करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सेंद्रीय शेती प्रशिक्षणास
शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला असुन चार हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थीनी
नोंदणी केली आहे. शेतकरी बांधवाच्या सेंद्रीय शेतमालास किफायशीर भाव मिळण्याच्या दृष्टीने प्रमाणीकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
विदेशात सेंद्रीय शेतमालास मोठी मागणी असल्याचे डॉ संगिताताई तोडमल यांनी आपल्या मनोगतात सांगितले तर श्रीमती मेघाताई देशमुख यांनी विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा शेतकरी बांधवा मोठा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच डॉ. अजय सिंह राजपूत यांनी सेंद्रीय शेतीत उत्पादकता ही मातीतील उपयुक्त जीवाणुवर अवलंबुन असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रमुख अन्वेषक डॉ आनंद गोरे यांनी प्रशिक्षणाबाबत
माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ रणचित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी
मानले. ऑनलाईन उदघाटन कार्यक्रमास तीन हजार पेक्षा जास्त शेतकरी बांधव, कृषि विस्तारक,
विद्यार्थी आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ स्मिता खोडके, डॉ मिनाक्षी
पाटील, डॉ अनुराधा लाड, डॉ पपिता गौरखेडे, डॉ श्रध्दा धुरगुडे, डॉ कैलास गाडे, डॉ दत्ता
बैनवाड, अभिजित कदम, सुनिल शिंदे, सतिश कटारे, सुनिल जावळे, दिपक शिंदे आदीसह विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांनी परिश्रम
घेतले
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणात दि. १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान रविवार वगळुन ऑनलाईन झुम मिटिंग प्लॅटफॉर्मवरुन सायंकाळी ७.०० ते ८.३० व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनल https://www.youtube.com/user/vnmkv यावर करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, रेशीम उद्योग, प्रक्रिया उद्योग, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, मधुमक्षीका पालन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर राज्यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था येथील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.