परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भगवान आसेवार यांची भारतीय कोरडवाहु शेती सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरील सोसायटी ही केंद्रीय कोरडवाहु शेती संस्था, संतोषनागर हैदराबाद येथून चालविण्यात येते, सदरील निवड ही डॉ. भगवान आसेवार यांचे कोरडवाहू शेती संशोधन व प्रसार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन २०२२-२०२३ या दोन वर्षाकरिता करण्यात आली आहे. डॉ. भगवान आसेवार यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने २०१९ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मागीलवर्षी राष्ट्रीय व राज्य पातळीवर केलेल्या कामाच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा प्रतिष्ठित पुरस्कार भारतीय कृषि विद्या सोसायटी आयएआरआय नवी दिल्ली या सोसायटीचे फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले होते. मागील २२ वर्षामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामान बदल, कोरडवाहू शेती, आंतरपीक पद्धती मुख्यतः सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धत, बागायती बीटी कापसासाठी लागवडीचे अंतर, खताची मात्रा आदी विषयावर संशोधन करून शिफारशी देण्यात डॉ. भगवान आसेवार यांचे मोलाचे योगदान आहे. मराठवाडयातील आठही जिल्ह्यासाठी हवामान बद्लानुरूप आकस्मिक योजना आराखडा तयार करणे तसेच हवामान बदल, कोरडवाहू शेती, दुष्काळाचे व्यवस्थापन याविषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले.