Wednesday, October 16, 2024

शेतकरी व शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण संवाद मालिकेचा १५ वा भाग करडई जवस लागवडीची पंचसुत्री या विषयावर दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे आदीची उपस्थिती होती.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी बंधु-भगिनी यांना केवळ शेतीचे तंत्रज्ञान नव्हे तर त्यांच्या मुलांना शिक्षण शिक्षणाच्या संधी तसेच शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावरही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यादृष्टीने शेती, शेतीपुरक व्यवसाय अशा विषयातील ज्ञान तंत्रज्ञान उपलब्ध करून देवून शेतकरी शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास साधने हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. रबी पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा याबाबतचे तंत्रज्ञान शेतक­यांना उपलबध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी करडई जवस लागवडीची पंचसुत्री यावर माहिती देताना करडई जवस पिकांमध्ये बीजप्रक्रीया, वेळेवर पेरणी, संतुलीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाजारपेठ व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच ते म्हणाले की, करडई पिकात पेरणीस उशीर झाल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो यामुळे वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे. करडई मध्ये परभणी- १२, पीबिएनएस- १५४, पीबिएनएस- ८६, पीबिएनएस- ४० तर जवस पिकाचे एलएसएल-९३, एलएन- १४२ हे वाण लागवडीसाठी वापरावेत.

शेतकरी बंधु-भगिणी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांचे समाधान केले. प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मिटींग, युट्यूब चॅनल, फेसबुक या सामाजिक माध्यामाद्वारे करण्यात आले.