Saturday, October 5, 2024

शेतकऱ्यांच्या यशोगाथा त्यांच्याच मुखातून ऐकण्याची संधी... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे रबी हंगामातील ज्वारी आणि हरभरा या पिकांच्या वाणांची निवड, पेरणी पद्धती, पेरणीची वेळ याबद्दलच्या पेरणीपूर्व नियोजनाची अचूक माहिती देण्यात येत असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी नक्कीच लाभ मिळेल असे प्रतिपादन कुलगुरू  मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक ४ ऑक्टोबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या चौदाव्या भागात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माननीय  कुलगुरू यांनी ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे आयोजकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. भविष्यात या कार्यक्रमात ५०० हून अधिक शेतकरी बंधू भगिनी सहभागी व्हावेत अशी आशा व्यक्त केली. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आणि वेळेनुसार मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात येईल. तसेच प्रश्न – उत्तरावर अधिकचा भर देण्यात येईल. शेतकरी बंधू-भगिनींनी ही आपल्या मित्र परिवारास या कार्यक्रमाचा माहिती देऊन विस्तार कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये यशस्वी शेतकऱ्याने अवलंबलेल्या चांगल्या शेतीतंत्रज्ञानाबद्दल त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात येईल. त्यांची यशोगाथा त्यांच्याच मुखातून ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही याप्रसंगी त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी कार्यक्रमाचे महत्व विशद करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी येणाऱ्या आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगून शेतीमध्ये करावयाची कामाचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी हरभरा लागवडीचे तंत्रज्ञान सांगताना हरभरा पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठीची वाणाची निवड, जमिनीची निवड, बीजप्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, गादी वाफ्यावरील लागवड या पंचसूत्रीबद्दल तसेच हरभरा पिकाची मर रोगाचे नियंत्रण याबद्दल माहिती दिली. तर डॉ. प्रीतम भुतडा यांनी ज्वार लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन आणि आभार डॉ. अनंत लाड यांनी केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून २०० हून अधिक शेतकऱ्यांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाना विद्यापीठाचे शास्त्रज्ञांनी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.