Monday, October 28, 2024

प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दिवाळी साजरी!

 


परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यात आली.  या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दीपावली निमित्त ग्रीटिंग कार्ड बनवले. पूर्वीच्या काळी दिवाळीनिमित्त लहान मुले मातीचे किल्ले तयार करण्यात रममाण होत असत. परंतू सध्याच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना अशा संधी मिळत नसल्याने, महाराष्ट्रातील परंपरा पुढील पिढयांपर्यंत पोहचवण्यासाठी शाळेमध्ये अप्रतिम अशी किल्याची सजावट करण्यात येऊन त्याबददल बालकांना माहिती देण्यात आली. तसेच पुर्वी दिपावलीनिमित्त  मुले घरकूल तयार करुन त्यात  खेळभांडी मांडून खेळत असत.  त्याप्रमाणे अशा खेळण्याचा आनंद बालकांना मिळावा या उददेशाने त्यांचे बाहूली घर  सजवण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य तसेच प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळा प्रमुख समन्वयिका डॉ.जया बंगाळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.  तसेच पर्यावरणाचे संरक्षण होण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी  बनवलेले विविध  आकर्षक आकाश कंदील,  तोरण, पणत्या  याचे अतिशय सुंदर  प्रदर्शन भरवण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल  शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.  या उपक्रमामध्ये    डॉ. नीता गायकवाड, प्रा.प्रियंका स्वामी  यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षिका  आणि शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया उत्साहाने सहभागी झाले.