Saturday, October 19, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षेत यशाची राखली परंपरा

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२४ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त करून महाविद्यालयाची परंपरा कायम ठेवली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मीरा शिंदे, सुषमा माने, दिव्या भगत, सय्यद बिलाल अझिमुद्दिन, श्वेता पुरोहित यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसेच आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. विशेष म्हणजे प्राची गट्टानी या कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरल्या असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे.

या विद्यार्थ्यांनी  सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून निवड होण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी साधलेले हे यश महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेचे व सामर्थ्याचे द्योतक आहे.