शेतकऱ्यांसोबत तंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती
संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात रबी हंगामासाठी ७६वी विभागीय
संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक २२ ऑक्टोबर रोजी पार पडली. या बैठकीचे
उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र
कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे) उपस्थित
होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर
कौसडीकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम
मोटे (छत्रपती संभाजीनगर),
सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत
पवार यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
यांनी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठाच्या संशोधन, कृषि शिक्षण आणि विस्तार कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "आम्ही शेतकरी देवोभव या भावनेने काम
करत आहोत, शेतकऱ्यांसोबत तंत्रज्ञान आणि माहितीची
देवाण-घेवाण करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे." सध्या मराठवाड्यात काही भागात जास्त पाऊस झाल्याने खरिपातील सोयाबीन मका कापूस या पिकाचे नुकसान झाले. पण उपलब्ध ओलाव्याची संधी समजून रबी पिकाची पेरणी कशी लवकरात लवकर होईल यावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेचे
महासंचालक श्री. रावसाहेब भागडे यांनी सोयाबीन पिकाच्या समस्या आणि त्यावर
उपाययोजनांवर चर्चा केली. त्यांनी सोयाबीन काढणीसाठी उपलब्ध तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या यंत्रांची
आवश्यकता, तसेच शेतकऱ्यांसाठी पीक किड रोग निदान
प्रयोगशाळा स्थापण्याच्या महत्त्वावर भर दिला.
विभागीय
कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी
पीक लागवड पद्धती बदलण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील
शेतकऱ्यांनी बेड पद्धतीचा अवलंब करून घेतलेल्या यशस्वी पिकांची उदाहरणे दिली. कृषि विद्यापीठ निर्मित करत असलेले बायोमिक्स हे अनेक पिकांना, फळपिकांना,मसाले,भाजीपाला पिकांना उपयुक्त होत आहे यामुळे पीक संरक्षण खर्च कमी होत आहे तसेच जैविक शेतीला प्रोत्साहनही मिळत आहे
असे नमूद केले.
प्रास्ताविकात सहयोगी संचालक संशोधन डॉ.
सूर्यकांत पवार यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या कृषि पुरक
उद्योगांची महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी "सिल्क आणि मिल्क" या
संकल्पनेचा उल्लेख करून शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेती आणि जैविक शेतीची
प्रोत्साहनात्मक भूमिका मांडली.
बैठकीचे संचालन डॉ. सुरखा कदम यांनी केले, तर विविध विभागांचे प्रमुख, कृषि शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांची बैठकीला उपस्थिती होती.