Sunday, October 6, 2024

उद्यानविद्या महाविद्यालायाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

 विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचा आदर करावा....कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयात दि. ५ ऑक्टोबर रोजी प्रथम वर्षाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते, तर विशेष अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि कुलसचिव श्री. संतोष वेणीकर हे होते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना उद्यानविद्या पदवीच्या माध्यमातून भविष्यातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक क्षेत्रात संधीं आहेत. या संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांचा आदर करत स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा असे नमूद केले. यावेळी त्यांनी  “काक चेष्टा बको ध्यानं, श्वान निद्रा तथैव च। अल्पहारी गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं॥” या संस्कृत सुभाषिताद्वारे  विद्यार्थ्यांना शिक्षणातील शिस्तीचे महत्त्व विशद केले.

विशेष अतिथी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल मार्गदर्शन केले, तर कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर यांनी उद्यानविद्या विभागाद्वारे उद्योगाच्या भरपूर संधी आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारून उद्योजक व्हावे. याबरोबरच उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करून प्रगतशील बागायतदार होण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. खंदारे यांनी उद्यानविद्या महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दिली तसेच इतर कार्याचा अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून समारंभाला उत्साहपूर्ण रंगत आणली. सूत्रसंचालन कु. साक्षी कल्याणकर आणि अक्षद केंद्रे यांनी केले, तर आभार डॉ. अंशुल लोहकरे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजनासाठी  डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. वैशाली भगत, डॉ. श्रुती वानखेडे, डॉ. सचिन पव्हणे आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे विशेष परिश्रम घेतले.