Friday, October 4, 2024

विद्या, धन आणि शक्ती यांचा उपयोग समाज कल्याणासाठी व्हावा - कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांचे कृषि पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालयाचा दीक्षारंभ समारंभ संपन्न


जगाचा आणि आपल्या देशाचा विचार करता, अंतराळ विज्ञान आणि कृषि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे. जेव्हा ज्ञानाच्या माध्यमातून विद्या, धन आणि शक्ती प्राप्त होईल, तेव्हा त्यांचा उपयोग समाजकल्याणासाठी केला गेला पाहिजे. अशा विचारसरणीमुळेच मानवी जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे नव्याने सुरू झालेल्या कृषि महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी आयोजित दीक्षारंभ समारंभात मार्गदर्शन करताना कुलगुरू महोदयांनी वरील विचार मांडले. कुलगुरू महोदय पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक शासकीय कृषि महाविद्यालय असावे अशी मनापासून इच्छा होती. हा जिल्हा आणि शहर राज्यातील महत्त्वाचे असून, शासन आणि विद्यापीठाच्या प्रयत्नांतून हे महाविद्यालय सुरू झाले, याचा अत्यंत आनंद आहे. याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसन्नता वाटते, असे प्रतिपादन केले.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांची जिज्ञासू गुण विकसित झाली पाहिजे, तसेच त्यांच्या मनावर ताण येवू नये यासाठी प्रवेश घेतल्यानंतर दीक्षारंभ कार्यक्रमात सुरुवातीचे १५ दिवस विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदान कार्य पार पडले असे नमूद केले. या प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, शास्त्रज्ञ डॉ. सी. बी. पाटील, डॉ. बाळासाहेब अंधारे आदींची  उपस्थिती होती.

मागील पंधरा दिवसांत विविध विषयांचे प्राध्यापक आणि बाह्य तज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला महाविद्यालयाशी जवळीक साधता आली, असे मनोगत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित दोन विद्यार्थ्यांनी कुलगुरू महोदयांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सुरेखा कदम यांनी केले.