Wednesday, October 2, 2024

वनामकृविच्या अन्नतंत्र महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळावा संपन्न

 ध्येयनिश्चिती करून उज्वल भविष्य घडवावे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी बी. टेक. अन्नतंत्र प्रथम वर्षात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके हे होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी उपस्थित पालकांचे त्यांच्या पाल्याने अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी पूर्वीच्या काळातील संस्कृत सुभाषिकामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी “काक चेष्टा बको ध्यानं, श्वान निद्रा तथैव च । अल्पहारी गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं॥“ या गुणांबद्दल मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक प्रणाली अभ्यासक्रमासाठी ही पहिली बॅच असून, याद्वारे अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य विकासाठी मोठी संधी मिळणार आहे. या महाविद्यालयांमध्ये केंद्रशासन पुरस्कृत सामायिक सुविधा केंद्रही आहे. यामुळे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत. विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चित करून, त्या दृष्टीने अभ्यास व कृती करावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन केले.
शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके म्हणाले की, यासाठी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार आहे. अन्न तंत्र शाखेमधिल रोजगार व उद्योगासाठीच्या संधीबद्दल मार्गदर्शन करून औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व विशद केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर बी क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्व विशद केले. नवीन शैक्षणिक प्रणालीचा विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच म्म्हाविद्यालायाच्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील हिरीरीने भाग घ्यावा असे सुचविले.
पालकांमध्ये प्रतिनिधिक स्वरूपात श्रीमती खळीकर यांनी आणि विद्यार्थ्यांमधून कुमारी गायत्री शिंदे हिने महाविद्यालय आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतरचे अनुभव सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. के एस गाडे, डॉ. व्ही डी सुर्वे, डॉ. एस के सदावर्ते, डॉ. जी एम माचेवाड, डॉ. अनुप्रिता जोशी, डॉ. एस एम सोनकांबळे, डॉ.चंद्रलेखा भोकरे आणि शिक्षण सहयोगी डॉ. प्रीती ठाकूर, डॉ. गोविंद देसाई, डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. सय्यद जुबेर, डॉ. मोहम्मद निसार आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन साक्षी पाठक आणि आयुष जीभकाटे यांनी तर आभार साक्षी तिखे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी केले.