Saturday, October 12, 2024

वनामकृवित “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

 प्रशिक्षणातून उमेदवारांच्या कार्यकुशलतेत वाढ होईल... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील युवकांसाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर विविध कार्यक्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षमता (Employability) वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमांतर्गत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्यालयात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. यानिमित्त दिनांक ११ ऑक्टोबर रोजी, विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या दालनात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. 

यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी सातत्य, कर्तव्यनिष्ठा आणि मेहनत महत्त्वाची आहे. त्यांनी उमेदवारांना शिस्त आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित करून कार्यक्षेत्रात नाविन्याचा अंगीकार करण्याचे तसेच नीती, मूल्ये आणि चारित्र्य जोपासण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणातून उमेदवारांच्या कार्यकुशलतेत वाढ होईल आणि भविष्यात रोजगाराच्या संधींमध्ये लाभ होईल. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळणार असून, त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, यांनी प्रशिक्षणार्थींना काळजीपूर्वक प्रशिक्षण घेण्याचे  आवाहन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी  शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, उपविद्यापीठ अभियंता डॉ. डी. डी. टेकाळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात योजनेचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक कुलसचिव श्री. पी. एम. पाटील यांनी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मुख्यालयासाठी एकूण ४६ पदे अधिसूचित केली होती. या पदांमध्ये कृषी सहाय्यक, वीजतंत्री आणि कनिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या ३६ उमेदवारांना विद्यापीठाने प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रुपये ६०००, ८००० आणि १०००० विद्यावेतन सहा महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून दिले जाणार आहे. तसेच ही योजना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील इतर कार्यालात कार्यान्वयित असल्याचे त्यांनी नमूद केले.