Saturday, October 12, 2024

वनामकृवितील करडई संशोधन प्रकल्पाद्वारे कृषी निविष्ठांचे वाटप

 आहारात व आरोग्यास करडईचे तेल महत्वाचे.... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या करडई पिकाच्या आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमा अंतर्गत कृषी निविष्ठा वाटप कार्यक्रम कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील जांब, मानोली आणि सोन्ना येथील शेतकऱ्यांना करडई पिकाच्या उत्पादकतेसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना या निविष्ठांचे वाटप मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एच. व्ही. काळपांडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी करडई या महत्त्वाच्या तेलबीया पिकाचे आहारातील व आरोग्यास असणारे फायदे तसेच यातील मूल्यवर्धनाच्या संधींविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करडई पिकामध्ये संशोधनाद्वारे अधिक उत्पादनक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष शिंदे यांनी केले. या प्रसंगी मानोली, जांब आणि सोन्ना येथील शेतकरी बांधव तसेच संशोधन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.