विद्यापीठ विकसित नवीन वाणाचे बियाणे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता पुढाकार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित पाच पिकांच्या वाणाचा नुकतेच भारताच्या राजपत्रात समावेश करण्यात आला असुन यामुळे सदर बियाणे मुख्य बीजोत्पादन साखळीमध्ये येण्याकरिता मदत होणार आहे. नवीन वाणांचे बियाणे शेतकरी बांधवापर्यंत पोहचण्याकरिता बराच वेळ लागतो, त्याकरिता शेतकरी सहभागातुन बीजोत्पादन कार्यक्रम विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत आहे. याकरिता नुकतेच राजपत्रात समावेश झालेल्या हरभ-याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) या वाणाच्या बियाणांची एक किलो वजनाची बॅग तयार करण्यात आली असुन दिनांक २५ ऑक्टोबर रोजी माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, डॉ डि के पाटील, डॉ स्मिता सोळंकी, डॉ एस पी मेहत्रे, डॉ किरण थोरात, डॉ अमोल मिसाळ, डॉ संतोष शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि म्हणाले की, हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हा वाण सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून मशीनव्दारे काढणी करिता उपयुक्त आहे. बदलत्या हवामानास अनुकूल कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे आणि किड-रोगास प्रतिकारक वाण निर्मितीवर विद्यापीठाचा भर आहे. बीजोत्पादक शेतकरी बांधवानी विद्यापीठाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार बीजोत्पादन करावे असा सल्ला दिला.
संशोधन संचालक डॉ खिजर बेग म्हणाले की, हरभ-याचा नवीन वाण परभणी चना -१६ बियाण्याच्या किलो वजनाच्या ५०० बॅग शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांना बीजोत्पादनाकरिता विक्री करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ प्रक्षेत्रावर ही बीजोत्पादन घेण्यात आले आहे. यामुळे पुढील वर्षी चांगले बीजोत्पादन होऊन अधिकाधिक शेतकरी बांधवांना लाभ होईल.
डॉ डि के पाटील यांनी सदर वाण ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो, याची दाणे टपोरे असुन १०० दाण्याचे वजन २९ ग्रॅम भरते असे सांगितले. कार्यक्रमात १५ शेतकरी बांधवांना एक किलो वजनाची बॅगांचे माननीय कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले.