Saturday, October 19, 2024

करडई, राजमा आणि जवस लागवड तंत्रज्ञावर ऑनलाईन मार्गदर्शन

 शास्वत उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज: कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या सोळाव्या भागात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शास्वत उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. डॉ. इन्द्र मणि यांनी रबी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी करडई, राजमा आणि जवस या पिकांची लागवड करून उत्पन्न वाढविण्यावर भर दिला. त्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमातील शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांनी आभार मानले आणि विद्यापीठाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या मार्गदर्शन उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विभागीय कृषि सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी राजमा पिकाच्या लागवडीसाठी बियाणे उपलब्धता आणि तंत्रज्ञानाबाबतची माहिती दिली.

तांत्रिक सत्रामध्ये हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाच्या अंदाजानुसार शेती नियोजन कसे करावे यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी करडई, राजमा आणि जवस पिकांच्या लागवडीसाठी पंचसुत्री सांगितली. यात बीजप्रक्रीया, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा समावेश होता असे नमूद केले.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील समस्यांवर प्रश्न विचारले, ज्यांना विद्यापीठातील तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. कार्यक्रमात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.