Friday, October 11, 2024

ज्वार संशोधन केंद्राद्वारे आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमात ज्वारीच्या सुधारित बियाण्यांचे वाटप

 ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून उद्योजकता अंगीकारावी.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि  


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित ज्वार संशोधन केंद्र, येथे आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत ज्वारीच्या सुधारित वाणांचे बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

या कार्यक्रमात डिग्रस जहागीर, गव्हाणे पिंपरी (ता. सेलू, जि. परभणी) येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांनी ज्वारीचे पारंपारिक महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी शेतकऱ्यांना ज्वारीपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करून उद्योजकतेचा अंगीकार करण्याचे यावेळी आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्वारीच्या बिजोत्पादनाच्या महत्त्वावर आणि ज्वारीचे क्षेत्र विस्तारावर भर देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री. सुनील पौळ (एफपीओ अध्यक्ष) यांनी ज्वारीचे मूल्यवर्धन करण्याची ग्वाही दिली आणि विद्यापीठाने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्वारीचे सुधारित बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ज्वार लागवडीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती प्रितम भुतडा यांनी माहिती दिली, तर कीड व्यवस्थापनावर डॉ. मिलिंद सोनकांबळे, रोग व्यवस्थापनावर डॉ. के. डी. नवगीरे, आणि आद्यरेषीय पिक योजना विषयी डॉ. जी. एम. कोटे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्वार संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एल. एन. जावळे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एम. कोटे यांनी मानले.