Monday, October 14, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

 विद्यापीठाच्या वीज देयकांत सुमारे ५० ते ६० टक्के बचत होईल.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत तसेच इतर महाविद्यालयाच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रसंगी बोलताना कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांनी सांगितले की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून, सौर उर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून, त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल, असे ते म्हणाले.

सोलर प्रकल्पासाठी ठाणे येथील मे. इऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी राजस्थान सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंट्स लि. च्या माध्यमातून काम करते. सुरुवातीला ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार असला, तरी भविष्यात ६४० किलोवॅट पर्यंत सौर ऊर्जा क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील पंचवीस वर्षांसाठी दर युनिट रु. ४.९९ प्रमाणे वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. याशिवाय, कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.

शुभारंभ प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ. राहूल रामटेके, उप अभियंता दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, इऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी एस.एन. पांडे आणि संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.