आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्रातील भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’
कार्यक्रमाचे दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या
सभागृहात आयोजित या कार्यक्रमास नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला.
अध्यक्षस्थानी व उद्घाटक म्हणून माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि उपस्थित होते. आपल्या
मार्गदर्शनात त्यांनी कृषि क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तंत्रज्ञानात्मक बदलांचा
उल्लेख करून विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवण्याचे आवाहन
केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान,
रिमोट सेन्सिंग, GIS, डिजिटल शेती, प्रिसिजन फार्मिंग, आधुनिक जैवतंत्रज्ञान आणि
डेटा-आधारित शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्रात मोठ्या
प्रमाणात परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करून
त्याचा शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग करावा, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांनी संशोधन,
नवोपक्रम, कृषि उद्योजकता, स्टार्टअप, आधुनिक शेती, कृषि
प्रक्रिया व मूल्यवर्धन आणि डिजिटल कृषि या क्षेत्रांमध्ये कार्य करावे. कृषि
शिक्षण केवळ नोकरी मिळविण्याचे माध्यम न राहता स्वतः रोजगार निर्माण करणारे आणि
शेतकरी व समाजाच्या विकासासाठी योगदान देणारे सक्षम कृषि व्यावसायिक घडविणारे
माध्यम ठरावे, असा संदेश त्यांनी दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट
प्रोजेक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत दंगट यांनी ऑनलाइन माध्यमातून
नवप्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या कृषि तंत्रज्ञानाचा
स्वीकार,
कौशल्यविकास, आधुनिक कृषि पद्धती आणि कृषि
क्षेत्रातील नव्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे
ज्ञान, संवादकौशल्य, व्यवस्थापन कौशल्य
आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करून नवीन कल्पना, नवोपक्रम
आणि उद्योजकतेच्या माध्यमातून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे,
असे त्यांनी आवाहन केले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना
विद्यापीठातील उपलब्ध शैक्षणिक, संशोधन, प्रात्यक्षिक आणि विद्यार्थी विकासाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
बदलत्या कृषि क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान,
डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि
डेटा-आधारित शेती यांचे ज्ञान आत्मसात करावे. तसेच समस्या सोडविण्याची क्षमता,
नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि उद्योजकतेचा
दृष्टिकोन विकसित करून ज्ञानाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणारे सक्षम कृषि
व्यावसायिक बनावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी नवप्रवेशित
विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करून दीक्षारंभ कार्यक्रमाचे महत्त्व व उद्देश
स्पष्ट केला. कृषि शिक्षणाच्या नव्या प्रवासाची ही सुरुवात असून विद्यार्थ्यांनी
महाविद्यालयातील शैक्षणिक, प्रात्यक्षिक, संशोधन व विद्यार्थी विकासाच्या विविध संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,
असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी, संशोधनवृत्ती, शिस्त, सकारात्मक
दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर भर देऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कृषि महाविद्यालय, लातूरचे माजी
अधिष्ठाता डॉ. यू. जी. कुलकर्णी यांनी आपल्या दीर्घ शैक्षणिक व प्रशासकीय
अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन जीवनात उपलब्ध असलेल्या
शैक्षणिक संधींचा जास्तीत जास्त उपयोग करून विषयाचे सखोल ज्ञान, प्रयोगशीलता आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित करावीत, असे
त्यांनी सांगितले. कृषि क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर शास्त्रीय
दृष्टिकोनातून उपाय शोधण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी विकसित करावी. क्षेत्रभेटी,
शेतकऱ्यांशी संवाद, संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर यांना महत्त्व देऊन भविष्यात कृषि
क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषिभूषण (छत्रपती संभाजीनगर) श्री. सागर सोनवणे, डिमिटर अॅग्रोसायन्सेस प्रा. लि चे
(छत्रपती संभाजीनगर) श्री. विनोद पाथ्रीकर, श्री. जगदीश
गायकवाड, तसेच गोसेवक व कृषि मार्गदर्शक (राणी-सावरगाव,
ता. गंगाखेड, जि. परभणी) श्री. शिवप्रसाद कोरे
यांनीही विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, आधुनिक
शेती, कृषि व्यवसाय, शाश्वत शेती आणि
भविष्यातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दिलीप झाटे, प्रभारी शिक्षण (पदवी) आणि प्रा. मकरंद भोगावकर, प्रभारी
शिक्षण (पदव्युत्तर), कृषि महाविद्यालय, परभणी यांनी केले. सूत्रसंचालन कु. शुभांगी शुक्ला आणि कु. आराध्या सिंह
यांनी केले. डॉ. अनुराधा लाड यांनी आभार मानले.
दीक्षारंभ कार्यक्रमाच्या माध्यमातून नवप्रवेशित विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाची दिशा, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, व्यावहारिक कौशल्ये आणि भविष्यातील कृषि क्षेत्रातील संधींबाबत व्यापक व प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)





.jpeg)




.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)
.jpeg)














.jpeg)