भारत, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या चार देशांतील एकूण २० प्रशिक्षणार्थींचा सहभाग; यामध्ये नेपाळचे ३, भूतानचे २, बांगलादेशचे २ आणि भारताचे १३ प्रशिक्षणार्थी.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील दोन
शास्त्रज्ञांनी संवर्धनशील व पुनरुज्जीवनशील शेती (Conservation and
Regenerative Agriculture) या विषयावरील १४ व्या प्रगत
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण अभ्यासक्रमात सहभाग नोंदविला आहे. विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शिफारशीनुसार आंतरराष्ट्रीय मका व गहू
सुधार केंद्र (CIMMYT), भारत यांच्याकडून या शास्त्रज्ञांचे
नामांकन करण्यात आले होते.
या
प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन
प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक तथा कृषिशास्त्रज्ञ डॉ. सुर्यकांत पवार आणि सहायक
प्राध्यापक (कृषिशास्त्र) डॉ. सुरेखा कदम यांची निवड झाली आहे. दिनांक २८ ऑक्टोबर
ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन आठवड्यांच्या
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामध्ये नेपाळ,
भूतान, बांगलादेश आणि भारत या चार देशांतील
एकूण २० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत.
CIMMYT, बोरलॉग
इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया (BISA) आणि भारतीय कृषि
अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या
प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश हवामान बदलाच्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या,
शाश्वत व उत्पादक शेती पद्धती विकसित करणे हा आहे. यामध्ये
संवर्धनशील शेती व पुनरुज्जीवनशील शेतीची तत्त्वे, मृदा
आरोग्य संवर्धन, पीक अवशेष व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचे जतन, पाणी व खतांचा कार्यक्षम
वापर, शेती उत्पादन खर्चात कपात आणि हवामान अनुकूल कृषि
तंत्रज्ञान या विषयांवर सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक तथा कृषि संशोधन व
शिक्षण विभागाचे सचिव माननीय डॉ. मांगी लाल जाट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (CIMMYT
- International Maize and Wheat Improvement Center) यांचे
भारतातील प्रमुख डॉ. महेश गथाला,
BISA (Borlaug Institute for South Asia) चे व्यवस्थापकीय संचालक तथा CIMMYT
चे Distinguished Scientist व Regional
Director for Asia डॉ. बी. एम. प्रसन्ना, ICAR चे उपमहासंचालक (कृषि विस्तार) डॉ. राजबीर सिंह, उपमहासंचालक
(नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन) डॉ. ए. के. नायक, डॉ. एस. के.
संवाल तसेच CIMMYT च्या Agroecology Specialist डॉ. अॅलिसन लेइंग यांच्यासह विविध संस्थांचे शास्त्रज्ञ व तज्ज्ञ उपस्थित
होते.
उद्घाटनप्रसंगी
माननीय डॉ. मांगी लाल जाट यांनी या प्रशिक्षण उपक्रमाच्या सातत्यपूर्ण आयोजनाचे
विशेष कौतुक केले. सन २०१० पासून सुरू असलेला हा उपक्रम कृषि संशोधन, मनुष्यबळ विकास आणि प्रत्यक्ष शेतावरील अनुभव
यांची सांगड घालणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. CIMMYT
संस्थेने या प्रशिक्षणाच्या सातत्यपूर्ण आयोजनासाठी आणि विकासासाठी
दिलेल्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
या
प्रशिक्षणादरम्यान सहभागी शास्त्रज्ञांना नवी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश
आणि पंजाब येथील विविध संशोधन संस्था व प्रक्षेत्रांना भेटी देण्याची संधी मिळत
आहे. ICAR-CSSRI, कर्नाल तसेच CIMMYT-BISA च्या लुधियाना येथील संशोधन प्रक्षेत्रासह मेरठ व मोदीपुरम येथील संशोधन
केंद्रांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. या
भेटींमध्ये Living Laboratories अर्थात प्रत्यक्ष संशोधन व
प्रात्यक्षिक प्रयोगशाळांमध्ये दीर्घकालीन संशोधनातून विकसित झालेल्या संवर्धनशील
शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यात येत आहे. यामध्ये पीक अवशेष व्यवस्थापन,
जमिनीची कमीत कमी मशागत, मृदा आरोग्य संवर्धन,
आधुनिक यांत्रिकीकरण आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांचा समावेश आहे.
या
प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुर्यकांत पवार यांनी
विद्यापीठामध्ये हवामान बदल आणि त्यासंदर्भातील संशोधन कार्याचे सादरीकरण केले.
तसेच विद्यापीठात सुरू असलेल्या संवर्धनशील शेतीविषयक प्रयोगांची माहिती देऊन
मराठवाड्यातील हवामान परिस्थितीच्या अनुषंगाने या तंत्रज्ञानाची उपयुक्तता विशद
केली.
या
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणामुळे सहभागी शास्त्रज्ञांना विविध देशांतील संशोधक, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि कृषि शास्त्रज्ञांशी
ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षणातून प्राप्त होणारे
आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि व्यावहारिक कौशल्ये
विद्यापीठातील संशोधन, अध्यापन व विस्तार शिक्षण कार्यात
उपयोगात आणता येणार आहेत. विशेषतः मराठवाड्यातील बदलत्या हवामान परिस्थितीत मृदा व
जलसंधारण, पीक अवशेष व्यवस्थापन, उत्पादन
खर्चात कपात आणि शाश्वत शेती पद्धतींच्या प्रसारासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच
लाभ होणार आहे.
सन २०१० मध्ये
CIMMYT आणि ICAR
यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरू झालेल्या या प्रशिक्षण
उपक्रमाच्या आतापर्यंत १४ आवृत्त्या यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या आहेत. दक्षिण
आशियातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि कृषि तज्ज्ञ यांच्यामध्ये
आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मजबूत व्यासपीठ निर्माण करण्यात या उपक्रमाचे
महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची निवड झाल्याबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणामुळे विद्यापीठाची संशोधन क्षमता वृद्धिंगत होण्यासह आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांशी सहकार्य अधिक दृढ होऊन मराठवाड्यातील शाश्वत, हवामान अनुकूल आणि संसाधन कार्यक्षम शेतीच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
%20-%20Copy.jpeg)


%20-%20Copy.jpeg)


