Tuesday, November 10, 2026

वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात दिवाळी स्नेहमिलन उपक्रम उत्साहात संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या संकल्पनेतून भाकृअप विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात देशाच्या विविध राज्यांमधून भारतीय कृषि अनुसंधान परिषेदे (भाकृअप) च्या कोट्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनी कृषि शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लांबचे अंतर आणि प्रवासासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी जाता येत नाही. त्यामुळे त्यांना सणासुदीच्या काळात कुटुंबीयांची उणीव भासू नये आणि महाविद्यालयातही कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने अंबाजोगाई कृषि महाविद्यालयात परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन व फराळ वाटपाचा विशेष उपक्रम दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. ते म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, परस्परांप्रती सद्भावना आणि बंधुभाव वृद्धिंगत होतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. या सणातून अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश जीवनात आणण्याची प्रेरणा मिळते. कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणींचा अंधार दूर करून त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

डॉ. ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला कौटुंबिक जिव्हाळ्याचा संवाद, केलेले प्रेमळ आदरातिथ्य आणि स्नेहपूर्ण वातावरण यामुळे विद्यार्थी भारावून गेले. महाविद्यालयातील या उपक्रमातून त्यांना घरापासून दूर असूनही कुटुंबीयांसोबत सण साजरा केल्याचा आनंद अनुभवता आला.

या प्रसंगी कृषि महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुहास जाधव, विश्वविख्यात पखवाजवादक पं. श्री. उद्धवबापू आपेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री. वसंतराव मोरे, प्रख्यात कवी डॉ. मुकुंद राजपंखे, श्री. राहुलदेव भवाळे, श्री. राजेश रेवले आणि श्रीमती मेघना चिरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्नेहमिलन उपक्रमात बिहार येथील आशी, खुशी कुमारी, श्रेया, सृष्टी, विपुल, सौरभ राज, अभिरव, हिमांशू, ऋतिक राज व आयुष; ओडिशा येथील साई सकेती, प्रिन्सी बिस्वाल, साई संकर, धर्मेंद्र साहू व सूर्यकांता बारिक; केरळ येथील मेघनाथन व सूर्यनारायण; पश्चिम बंगाल येथील टुबाई डे व शादाब कुमार; तामिळनाडू येथील धनुष एम.; अरुणाचल प्रदेश येथील फुंत्सो छोटोन व गिल नासो; छत्तीसगड येथील मिनेश कुमार; त्रिपुरा येथील विशाल पोद्दार; उत्तर प्रदेश येथील विष्णू प्रताप व अमृतांशू; मध्य प्रदेश येथील मयंक साहू तसेच राजस्थान येथील हर्षिता, अंकित व दुबेडिया यांच्यासह विविध राज्यांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची भावना अधिक दृढ झाली.