Monday, March 3, 2025

माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी सकाळ नांदेड आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

 

'सकाळ' नांदेड आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन सोमवारी (३ मार्च २०२५) करण्यात आले. या निमित्ताने वाचक, लेखक, हितचिंतक, जाहिरातदार आणि वितरकांसाठी स्नेहमेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्याक्रमास माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि  यांनी  'सकाळ' मराठवाडा आवृत्तीचे संपादक श्री संतोष शाळीग्राम यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत सकाळ मराठवाडा युनिट चे सरव्यवस्थापक श्री. संजय चिकटे, ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी श्री माणिकराव रासवे, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी श्री गणेश पांडे, प्रगतशील शेतकरी श्री जनार्दन आवरगंड आदी मान्यवर उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी प्रसिद्ध शास्त्रीय भजन गायक पंडित यादवराज फड यांच्या 'संतवाणी' या भजन संगीतातून श्रोत्यांना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंद मिळला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भक्तिरसात न्हाऊन निघाले. हा कार्यक्रम परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाला.

Sunday, March 2, 2025

वनामकृविच्या संशोधन लेखाला महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या रौप्य महोत्सवी परिषदेतील द्वितीय पारितोषिक!

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या (MSAE) २५व्या रौप्य महोत्सवी परिषदेत सादर करण्यात आलेल्या संशोधन लेखाला द्वितीय पारितोषिक (रौप्य पदक) आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

"महाराष्ट्रातील शेतीच्या हवामान बदलासंदर्भातील असुरक्षिततेचे स्थानिक विश्लेषण" (Spatial Analysis of Agricultural Vulnerability to Climate Change in Maharashtra) या शोधनिबंधाचे लेखन श्रीमती कवी भारती (PhD विद्यार्थीनी), प्रमुख मार्गदर्शक श्री. सचिन एस. मोरे आणि सदस्य श्री. आर. व्ही. चव्हाण यांनी केले आहे.

ही प्रतिष्ठेची परिषद महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे दिनांक २७-२८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या संशोधनास कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या परिणामांवर महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल गौरविण्यात आले.

यामुळे विद्यापीठामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण संशोधन चमूचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कृषि अर्थशास्त्र परिषदेत साक्षी देऊळकर यांचा गौरव – द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले साक्षीचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर (जि. लातूर)येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. साक्षी देऊळकर यांनी २५ व्या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेत आपल्या उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ही प्रतिष्ठित परिषद दि. २७-२८ फेब्रुवारी २०२५ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली होती.

साक्षी देऊळकर यांनी "डिजिटल साधनांचा व्यावसायिक संवादावर होणारा प्रभाव: एक प्रायोगिक अभ्यास" या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय विश्लेषण व ठोस निष्कर्ष यामुळे परीक्षकांनी त्यांना गौरवले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या संशोधनासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्योती झिरमिरे आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एच. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. साक्षी देऊळकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Friday, February 28, 2025

कृषि विज्ञान केंद्रांनी ‘मालआधारित’ कृती आराखडा राबवावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी कार्यशाळेचा यशस्वी समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय आणि अटारी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील कृषि विज्ञान केंद्रांच्या वार्षिक कृती आराखड्यासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप २८ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर,  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कार्यशाळेतील मंथनातून निघालेल्या मुद्द्यांवर समाधान व्यक्त करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कृषि विज्ञान केंद्रांच्या आगामी कृती आराखड्यात कृषि माल आधारित (Commodity Base) दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित कृती आराखडा तयार करून पीक, पशुधन, रेशीम, मधुमक्षिका अशा विविध घटकांवर उद्योजकता विकासावर भर द्यावा. यामध्ये यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञानाचा समावेश करून शेतकरीहित साधण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

"शेतीसाठी जशी पाण्याची गरज आहे, तशीच ज्ञानाचीही गरज आहे. हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कृषि विज्ञान केंद्रांनी करावे. तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबत पीकनिहाय शाश्वत उत्पादनासाठी मानके आणि मापदंड निश्चित करावेत. तसेच प्रत्येक कृषि विज्ञान केंद्राने एक विशेष कार्यक्षेत्र ठरवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी," असेही कुलगुरूंनी मार्गदर्शन करताना सांगितले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी या कार्यशाळेतील सर्व ठरावांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत मराठवाड्यातील १२ कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विषयतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या केंद्रांनी मागील वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल तज्ज्ञांसमोर सादर केला. या अहवालांवर सखोल चर्चा झाली आणि विविध विभागांच्या कार्ययोजनांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. प्रफुल्ल घंटे, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकरीहिताच्या दृष्टीने ठोस आराखडा आखण्यात आला असून, कृषि विज्ञान केंद्रांद्वारे याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

वनामकृविच्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्रास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार जाहीर

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून मिळाले यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र या कार्यालयास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाने (FSRDA) जाहीर केले आहेत. एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले जात आहे. या पुरस्कारामध्ये मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांना एफएसआरडीए फेलो पुरस्कार तसेच या प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. जनार्धन अवर्गंड आणि श्री. रत्नाकर ढगे यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार आणि या प्रकल्पावर सादर केलेल्या प्रबंधास उकृष्ट प्रबंध पुरस्कार असे एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत.

सदरील पुरस्कार मोदीपुरम येथे दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाद्वारा कळविण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी दिली.

एखाद्या संशोधन केंद्राला एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पुरस्कार मिळाल्यामुळे शास्त्रज्ञामध्ये चैतन्य निर्माण झाले. पुरस्कार विजेते शेतकरी यांनी हवामान बदल, बाजार भावातील चढ उतार, जमिनीचे खालावलेले आरोग्य या पार्श्वभूमीवर एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून एकीकडे शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढविले तर दुसरीकडे रोजगार निर्मिती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन करण्यात मोठे कार्य केले आहे. याबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून एकीकडे लागवडीवरील खर्च कमी करून विषमुक्त शेत उत्पादन घेतले आणि जमिनीचे आरोग्य  सुधारण्याचे कार्य केले. त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र या कार्यालयाचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.

सदर शेतकरी बांधवांचे प्रस्ताव तयार करण्यात आणि पाठविण्यासाठी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग  आणि प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शरद चेनलवाड, डॉ. सुदाम शिराळे, श्री. मिर्झा, श्री. दुतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


वनामकृवितील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे!.. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सत्कार 

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, सहाय्यक नियंत्रक श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन आणि लघु लेखक श्री अनिल प्रभाकरराव खोटारे हे नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. यानिमित्त त्यांना विद्यापीठाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सत्कारमूर्तीं डॉ. गिरधारी वाघमारे, श्रीमती दिशा गिरधारी वाघमारे, सत्कारमूर्तीं श्री. शेख मकसूद, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आपण सर्व दिन साजरे करतो आपली संस्कृती आहे. आपण जन्मलो की आपल्या निवृत्तीचा दिनांक ही ठरलेला असतो आणि त्यानुसार निवृत्त व्हावेच लागते. परंतु दरम्यानच्या काळात अनेक मोठ्या संस्था सोबत कार्य केलेले असते.पली संस्कृती आहे की त्यांच्याद्वारे होणारे सन्मान, सत्कार हेच आपले अस्तित्व महत्त्वाचे आहे हे सिद्ध करते. यानुसार डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या निरोप समारंभातील उत्साह म्हणजेच त्यांचे  विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होते हे सिद्ध होते. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यामध्ये झोकून देऊन समर्पण भावनेने कार्य केले. त्यांनी शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासकीय कार्य प्रभावीपणे निभावले. शेवटच्या दिवसापर्यंत ही कार्य करून मराठवाडा स्तरीय कृषि विज्ञान केंद्राच्या पुढील वर्षासाठीच्या कृती आराखड्यासाठी कार्यशाळा आयोजन करून विस्तार कार्याची नियोजन करून दिले. त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्नमुद्रेचे असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती कार्यभाव सतत झळकताना दिसतो असे गौरव उद्गार माननीय कुलगुरू यांनी त्यांच्या प्रति केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी श्री. शेख मकसूद यांच्याप्रतीही आदरयुक्त वक्तव्य करून ते सरळ स्वभावाचे आणि कार्यंमग्न व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. याबरोबरच श्री अनिल खोटारे हे देखील आपल्या कार्याशी बांधील असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन केले.

त्यांनी सुखदुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे, इतरत्र न पाहता कार्य मग्न राहून स्वतःच्या कार्यावरती प्रेम करावे. सतत जीवनामध्ये आनंदाचे क्षण शोधावेत, असा प्रेरणादायी सल्ला सर्व उपस्थितांना दिला.

सत्कारमूर्ती डॉ. गिरधारी वाघमारे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिलेल्या आजपर्यंतच्या विविध जबाबदाऱ्यासाठी आणि माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य करण्याची संधी मिळाली याबद्दल  आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःचा शालेय जीवनापासून ते निवृत्ती पर्यंतचे अनुभव आणि कार्य विशद केले. व्यवसायिक आणि कौटुंबिक आठवणींना उजाळा देत असताना ते थोडेसे भावूक झाले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला या मुळे मी यशस्वी कार्य करू शकलो असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सेवानिवृत्तीचे सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांनी कुलसचिव आणि नियंत्रक कार्यालयाचेही विशेष आभार मानले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत असलेल्या दीर्घकालीन कार्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच श्री  शेख मकसूद आणि श्री अनिल खोटारे यांचेही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या कार्यात नाविन्यपूर्णता असायची. त्यांच्याकडून अनेक बाबी शिकण्यास मिळाल्या त्याचा माझ्या सेवेमध्ये लाभ होत आहे, असे नमूद करून त्यांना तसेच श्री शेख मकसूद व अनिल खोटारे यांना शुभेच्छा दिल्या

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत कार्य करत असतानाचे अनुभव सांगून त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्यांनीही आजच्या तीनही सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सोबत कार्य करण्याचा कालावधी केवळ तीन महिनेच लाभला. यातून ते शिस्तप्रिय असून कार्यास दिशा देणारे होते हे प्रकर्षाने जाणवले. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सतत शास्त्रज्ञ म्हणूनच कार्य करत होते असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम समन्वयिका डॉ. दीप्ती पाटगावकर आणि डॉ. एस. व्ही. सोनुने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ. हनुमान गरुड यांनी मानले.





माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन यांचा सत्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री अनिल खोटारे यांचा सत्कार

वनामकृवितील कर्मचारी कवी पांडुरंग वागतकर यांची कविता 'करपलेली खोळ' दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवडली

 कवीच्या पाठीवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची कौतुकाची थाप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचारी आणि कवी श्री. पांडुरंग वागतकर यांच्या "करपलेली खोळ" या कवितेची निवड दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या विशेष सत्रासाठी करण्यात आली होती. दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे कवी वागतकर यांनी ही हृदयस्पर्शी कविता सादर केली.

या कवितेतून कवीने दुष्काळामुळे शेतकऱ्यांना भोगावे लागणारे हाल दर्शवले आहेत. त्यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे:

गोट्यावरच्या पाचटाला चघळुन पोटाची आग विजवते गाय,
कनगिच्या तळाला घरासाठी भाकर शोधते माय.

आटलेल्या विहीरीवर चिखलाचा हुंगते गाय,
हंडाभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते माय.

या ओळींमधून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेने विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य सातत्याने करत आहे. विद्यापीठातील कर्मचारी पांडुरंग वागतकर यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या काव्यप्रतिभेची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कवी वागतकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, उपकुलसचिव श्री. पु. को. काळे यांनीही कवी पांडुरंग वागतकर यांचे अभिनंदन केले.

कवी वागतकर यांनी आपल्या कवितेतून दुष्काळग्रस्त जनजीवनाचे वास्तव मांडत, शेती आणि शेतकऱ्यांची होणारी अवस्था समोर आणली आहे. त्यांनी पुढे लिहिले आहे:

दुष्काळात गेलेल्या वासरासाठी गोठ्यात हंबरते गाय,
आटला पाना जरी स्थनातून रक्त पाजते माय.

या ओळींमधून दुष्काळी परिस्थितीत जनावरांवर आणि कुटुंबांवर होणारे परिणाम कवी वागतकर यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केले आहेत. त्यांच्या या कवितेने मराठी साहित्य संमेलनात उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.