Friday, February 28, 2025

वनामकृवितील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे!.. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सत्कार 

वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, सहाय्यक नियंत्रक श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन आणि लघु लेखक श्री अनिल प्रभाकरराव खोटारे हे नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले. यानिमित्त त्यांना विद्यापीठाच्या वतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सत्कारमूर्तीं डॉ. गिरधारी वाघमारे, श्रीमती दिशा गिरधारी वाघमारे, सत्कारमूर्तीं श्री. शेख मकसूद, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आपण सर्व दिन साजरे करतो आपली संस्कृती आहे. आपण जन्मलो की आपल्या निवृत्तीचा दिनांक ही ठरलेला असतो आणि त्यानुसार निवृत्त व्हावेच लागते. परंतु दरम्यानच्या काळात अनेक मोठ्या संस्था सोबत कार्य केलेले असते.पली संस्कृती आहे की त्यांच्याद्वारे होणारे सन्मान, सत्कार हेच आपले अस्तित्व महत्त्वाचे आहे हे सिद्ध करते. यानुसार डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या निरोप समारंभातील उत्साह म्हणजेच त्यांचे  विद्यापीठाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होते हे सिद्ध होते. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यामध्ये झोकून देऊन समर्पण भावनेने कार्य केले. त्यांनी शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासकीय कार्य प्रभावीपणे निभावले. शेवटच्या दिवसापर्यंत ही कार्य करून मराठवाडा स्तरीय कृषि विज्ञान केंद्राच्या पुढील वर्षासाठीच्या कृती आराखड्यासाठी कार्यशाळा आयोजन करून विस्तार कार्याची नियोजन करून दिले. त्यांचे व्यक्तिमत्व प्रसन्नमुद्रेचे असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती कार्यभाव सतत झळकताना दिसतो असे गौरव उद्गार माननीय कुलगुरू यांनी त्यांच्या प्रति केले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी श्री. शेख मकसूद यांच्याप्रतीही आदरयुक्त वक्तव्य करून ते सरळ स्वभावाचे आणि कार्यंमग्न व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. याबरोबरच श्री अनिल खोटारे हे देखील आपल्या कार्याशी बांधील असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन केले.

त्यांनी सुखदुःखाची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन ठेवावे, इतरत्र न पाहता कार्य मग्न राहून स्वतःच्या कार्यावरती प्रेम करावे. सतत जीवनामध्ये आनंदाचे क्षण शोधावेत, असा प्रेरणादायी सल्ला सर्व उपस्थितांना दिला.

सत्कारमूर्ती डॉ. गिरधारी वाघमारे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिलेल्या आजपर्यंतच्या विविध जबाबदाऱ्यासाठी आणि माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य करण्याची संधी मिळाली याबद्दल  आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःचा शालेय जीवनापासून ते निवृत्ती पर्यंतचे अनुभव आणि कार्य विशद केले. व्यवसायिक आणि कौटुंबिक आठवणींना उजाळा देत असताना ते थोडेसे भावूक झाले. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला या मुळे मी यशस्वी कार्य करू शकलो असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सेवानिवृत्तीचे सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून दिल्याबद्दल त्यांनी कुलसचिव आणि नियंत्रक कार्यालयाचेही विशेष आभार मानले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत असलेल्या दीर्घकालीन कार्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच श्री  शेख मकसूद आणि श्री अनिल खोटारे यांचेही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या कार्यात नाविन्यपूर्णता असायची. त्यांच्याकडून अनेक बाबी शिकण्यास मिळाल्या त्याचा माझ्या सेवेमध्ये लाभ होत आहे, असे नमूद करून त्यांना तसेच श्री शेख मकसूद व अनिल खोटारे यांना शुभेच्छा दिल्या

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी डॉ. गिरधारी वाघमारे यांच्यासोबत कार्य करत असतानाचे अनुभव सांगून त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्यांनीही आजच्या तीनही सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विस्तार शिक्षण संचालनालयामध्ये डॉ. गिरधारी वाघमारे यांचा सोबत कार्य करण्याचा कालावधी केवळ तीन महिनेच लाभला. यातून ते शिस्तप्रिय असून कार्यास दिशा देणारे होते हे प्रकर्षाने जाणवले. ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सतत शास्त्रज्ञ म्हणूनच कार्य करत होते असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रम समन्वयिका डॉ. दीप्ती पाटगावकर आणि डॉ. एस. व्ही. सोनुने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केले तर आभार डॉ. हनुमान गरुड यांनी मानले.





माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री. शेख मकसूद अहेमद मैनोद्दीन यांचा सत्कार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते श्री अनिल खोटारे यांचा सत्कार