Sunday, March 2, 2025

कृषि अर्थशास्त्र परिषदेत साक्षी देऊळकर यांचा गौरव – द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले साक्षीचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर (जि. लातूर)येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. साक्षी देऊळकर यांनी २५ व्या राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेत आपल्या उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. ही प्रतिष्ठित परिषद दि. २७-२८ फेब्रुवारी २०२५ रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आली होती.

साक्षी देऊळकर यांनी "डिजिटल साधनांचा व्यावसायिक संवादावर होणारा प्रभाव: एक प्रायोगिक अभ्यास" या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय विश्लेषण व ठोस निष्कर्ष यामुळे परीक्षकांनी त्यांना गौरवले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या संशोधनासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्योती झिरमिरे आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एच. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. साक्षी देऊळकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.