Friday, February 28, 2025

वनामकृविच्या एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्रास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार जाहीर

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून मिळाले यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र या कार्यालयास राष्ट्रीय पातळीवरील सहा पुरस्कार प्राप्त. सदरील पुरस्कार मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाने (FSRDA) जाहीर केले आहेत. एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्राचे कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली साकारले जात आहे. या पुरस्कारामध्ये मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांना एफएसआरडीए फेलो पुरस्कार तसेच या प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे, श्री. ज्ञानोबा पारधे, श्री. जनार्धन अवर्गंड आणि श्री. रत्नाकर ढगे यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार आणि या प्रकल्पावर सादर केलेल्या प्रबंधास उकृष्ट प्रबंध पुरस्कार असे एकूण सहा पुरस्कार मिळाले आहेत.

सदरील पुरस्कार मोदीपुरम येथे दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय  एकात्मिक शेती पद्धती परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाद्वारा कळविण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांनी दिली.

एखाद्या संशोधन केंद्राला एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पुरस्कार मिळाल्यामुळे शास्त्रज्ञामध्ये चैतन्य निर्माण झाले. पुरस्कार विजेते शेतकरी यांनी हवामान बदल, बाजार भावातील चढ उतार, जमिनीचे खालावलेले आरोग्य या पार्श्वभूमीवर एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून एकीकडे शेती उत्पादन आणि उत्पन्न वाढविले तर दुसरीकडे रोजगार निर्मिती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन करण्यात मोठे कार्य केले आहे. याबरोबरच सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून एकीकडे लागवडीवरील खर्च कमी करून विषमुक्त शेत उत्पादन घेतले आणि जमिनीचे आरोग्य  सुधारण्याचे कार्य केले. त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन केंद्र, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र या कार्यालयाचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.

सदर शेतकरी बांधवांचे प्रस्ताव तयार करण्यात आणि पाठविण्यासाठी संचालक संशोधन डॉ. खिजर बेग  आणि प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शरद चेनलवाड, डॉ. सुदाम शिराळे, श्री. मिर्झा, श्री. दुतकर यांनी विशेष परिश्रम घेतले.